लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अजनीत मल्टी मॉडेल पॅसेंजर हब साकारण्यात येणार असून त्यासाठी भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने पहिल्या टप्प्यात १२०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. या प्रकल्पासाठी २६ फेब्रुवारीला निविदा काढण्यात येणार असून लवकरच रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन होईल. या प्रकल्पाचे डिझाईन अमेरिकेच्या आर्किटेक्टने तयार केले आहे. यानुसार अजनीत रेल्वे, मेट्रो, बस, ऑटो, हॉटेल, गार्डन आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामुळे नागपूर शहराचे चित्र बदलणार असून अजनी रेल्वस्थानक देशातील पहिल्या क्रमांकाचे रेल्वेस्थानक होईल, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केले.नागपूर रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेकडील भागातील गार्डनमध्ये आयोजित लोकार्पण समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ऊर्जा तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे ‘डीआरएम’ सोमेश कुमार, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाच्या ‘डीआरएम’ शोभना बंदोपाध्याय, माजी अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक त्रिलोक कोठारी, रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा उपस्थित होते. गडकरी म्हणाले, मध्य रेल्वे आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात गोंदिया-जबलपूर ब्रॉडगेज, छिंदवाडा-नागपूर ब्रॉडगेज, नागपूर-राजनांदगाव थर्ड लाईनसह ४५०० कोटींची विकासकामे होत आहेत. याशिवाय रेल्वेस्थानकांवर फुट ओव्हरब्रीज, रॅम्प, लिफ्ट, सीसीटीव्ही, वायफायची सुविधा पुरविण्यात येत आहे. गोधनी आणि खापरी रेल्वेस्थानकाचा विकास करण्यात येत आहे. रस्त्याऐवजी विजेवर आधारित सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला चालना देणे हा या मागील उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक ‘डीआरएम’ सोमेश कुमार, शोभना बंदोपाध्याय यांनी केले. यावेळी वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कुश किशोर मिश्र, विभागीय अभियंता सिरोलीया, स्टेशन संचालक दिनेश नागदेवे, रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन आणि आभार प्रदर्शन सुशील तिवारी यांनी केले.रेल्वेस्थानक परिसराचा होईल विकासलोकार्पण समारंभात नितीन गडकरी यांनी नागपूर रेल्वेस्थानक परिसराचा विकास करण्यात येणार असल्याचे सांगितले. यानुसार जयस्तंभ चौकात जंक्शन विकसित करण्यात येईल. त्याची निविदा काढण्यात आली आहे. स्टेशन समोरील उड्डाणपुलाला तोडण्यात येणार असून पुलाखालील दुकानदारांचे पुनर्वसन करण्यात येईल.अजनीत थांबणार सहा रेल्वेगाड्याआपल्या भाषणात गडकरींनी अजनी रेल्वेस्थानकावर सहा नव्या रेल्वेगाड्यांना थांबा देण्याची घोषणा केली. यात नागपूर-पुणे गरीबरथ एक्स्प्रेस, पुणे-नागपूर गरीबरथ एक्स्प्रेस, नागपूर-सिकंदराबाद एक्स्प्रेस, सिकंदराबाद-नागपूर एक्स्प्रेस, नागपूर-कोल्हापूर एक्स्प्रेस, कोल्हापूर-नागपूर एक्स्प्रेसचा समावेश आहे.तिरंगा ध्वज फडकविलारेल्वेस्थानकावर १०० फुट उंचीच्या टॉवरवर ३० फुट बाय २० फुट आकाराच्या तिरंगा ध्वज फडकविण्यात आला. आरपीएफ आणि स्काऊट आणि गाईडच्या बँड पथकाने राष्ट्रधून सादर केली. तर बालकांनी विविध महापुरुषांची वेशभूषा केली केली. त्यांचा उत्साह आरपीएफचे कमांडंट ज्योती कुमार सतीजा वाढवित होते.फेब्रुवारीअखेर मेट्रोचा शुभारंभगडकरी यांनी फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत प्रवासी सेवेचा शुभारंभ होण्याची अपेक्षा व्यक्त केली. या प्रकल्पात ११ हजार कोटी रुपयांच्या दुसऱ्या टप्प्याच्या डीपीआरला राज्य शासनाने मंजुरी देऊन केंद्र शासनाकडे पाठविला आहे. केंद्र सरकारची लवकरच यास मंजुरी मिळणार आहे.
- नागपूर रेल्वेस्थानकावर १०० फुट उंच टॉवरवर ३० फुट बाय २० फुट आकाराच्या राष्ट्रध्वज मोटर आॅपरेटेड सिस्टीमद्वारे फडकविला.
- नागपूर-छिंदवाडा ब्रॉडगेज प्रकल्पांतर्गत इतवारी-केळवद ब्रॉडगेज मार्गावर नव्या रेल्वेगाडीला व्हिडीओ लिंकद्वारे हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ.
- नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २/३ आणि ४/५ वर एस्क्लेटरचे लोकार्पण.
- नागपूर-मुंबई दुरांतो, नागपूर-अहमदाबाद प्रेरणा एक्स्प्रेस आणि नागपूर-जयपूर एस्क्प्रेसमध्ये एलएचबी कोचचे लोकार्पण.
- इतवारी-केळवद या गाडीला इतवारी रेल्वेस्थानकावर आ. कृष्णा खोपडे, क्षेत्रीय रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीचे सदस्य प्रताप मोटवानी, रेल्वेचे अधिकाऱ्यांनी हिरवी झेंडी दाखवून रवाना केले.