लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भ्रमंतीचे वेड असलेल्या बाईक रायडर आकाश साल्वे यांनी ११ दिवसात ३,३१३ किमीचे अंतर कापत आपल्या ध्येयाची प्रचिती दिली आहे.
आकाश मेयो इस्पितळात रजिस्टर्ड मेल नर्स आहे. बाईक रायडिंगचे वेड असल्याने ते विभिन्न क्लबशी जोडले गेले आहेत. ऑरेंज सिटी रायडर्स क्लबचे ते प्रेसिडेंटही आहेत. गेल्या सात महिन्यात कोरोनामुळे ते इस्पितळात व्यस्त होते. त्यामुळे लांबच्या रायडिंगचा विचारही करता येत नव्हता. मात्र, दर रविवारी सुटीच्या दिवशी तयारी सुरू होती. कोरोनाचा संसर्ग ओसरला आणि उसंत मिळाली. सात महिन्याच्या व्यस्ततेनंतर शिंखुला, अटल टन पास ते नागपूर असा प्रवास १४ ते २४ ऑक्टोबरदरम्यान एकट्याने करण्याचा निर्धार केला आणि तो प्रवास पूर्णही केला आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षीच ही राईड करण्याचा निर्धार होता आणि ही राईड सुरूही केली होती. मात्र, राईडदरम्यान झांशी येथे अपघात झाला. अपघातात डाव्या पायाला फ्रॅक्चर झाले आणि ही राईड अर्धवट सोडावी लागली होती. नंतर कोरोना प्रादुर्भावामुळे ते शक्य झाले नव्हते. आता मात्र ही राईड पूर्ण केली. दिल्लीपासून १४ ऑक्टोबरला सुरू केलेली राईड नागपुरात २४ ऑक्टोबरला फुटाळा येथे समाप्त झाली.
जागोजागी कोरोना टेस्ट
कोरोना काळातच १४ ऑक्टोबरला दुपारी १ वाजता राईडला सुरुवात झाली. त्यासाठी आधी आरटीपीसीआर टेस्ट करवून घेतली. टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर दिल्ली येथून अटल टनल (मनाली), शिंखुला माऊंटेन पास (१६,५८० फूट), लिंगशेड विलेज, शिंगेला माऊंटेन पास (१६,५०० फूट), सिरली ला माऊंटेन पास (१५,८०० फूट) आणि न्यू जंस्कर व्हॅली अशा भागातून ही राईड सुरू होती. साधारणत: ३०० किमीचे अंतर अतिशय दुर्गम भागातूनही कापावे लागले. सकाळी ८ ते संध्याकाळी ६ वाजतापर्यंत ही राईड असे आणि त्यानंतर मुक्काम ठोकावा लागत असे. बर्फाळ भाग, गारठा यामुळे गाडी घसरण्याची भीती सतत असे.
स्वप्न पूर्ण झाले
लेह-लडाखपर्यंतचा बाईक प्रवास हा स्वप्न पूर्ण झाल्याचा विषय आहे. प्रवास दिल्लीतून करण्याचा निर्धार केल्यानंतर बाईक कुरिअरने दिल्लीला पाठवली. मग दिल्ली, चंडीगड, मनाली, दार्चा, शिंखुला, पुरने, पदुम, लिंगशेड, फोटोकसर, खलस्ते, लेह, पांग, सर्चू, मनाली, चंडीगड, दिल्ली, झांशी, सागर, सिवनी आणि नागपूर असा ९ राज्यांतून हा प्रवास झाल्याचे आकाश साल्वे यांनी सांगितले.