लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पु.ल. देशपांडे, ग.दि. माडगुळकर (गदिमा) आणि सुधीर फडके ऊर्फ बाबूजी या महात्रयींच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून ‘त्रैगुण्य एक संस्मरणीय प्रवास’ या कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले. गीत, संगीत, कविता, नाट्य आणि नकलांनी सजलेल्या या कार्यक्रमाचा रसिकांनी मनमुराद आनंद लुटला.सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्यावतीने दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र येथे या सर्वांगसुंदर कार्यक्रमाचे आयोजन झाले. कुणाल गडेकर यांची संकल्पना असलेल्या या कार्यक्रमात गुणवंत घटवई, मंजिरी वैद्य यांनी सुरेल गाणी सादर केली. ‘माझे जीवनगाणे..., एकाच या जन्मी जणू..., इंद्रायणीच्या काठी..., जीवलगा कधी रे येशील..., आकाशी झेप घे रे पाखरा...’ अशी एकाहून एक मराठी भावगीत, चित्रपट गीते व नाट्यपदे सुरेलपणे सादर करून श्रोत्यांना तृप्तीचा आनंद दिला. मंजिरी वैद्य यांनी गायलेल्या ‘जाळीमंदी पिकली करवंद...’ या लावणीला रसिकांकडून वन्स मोअरची दाद मिळाली. गायकांच्या स्वरांना विशाल दहासहस्र, गोविंद गडीकर, मोरेश्वर दहासहस्र यांनी वाद्यतंत्रांची साथसंगत केली. गीतसंगीतासह नाटकांची छटाही कलावंतांनी पेरली. सतीश ठेंगडी, कलाधर रानडे, नाना पंडित, अभय बाळदे, अरुण जोशी, वर्षा लाखे, अंकिता पोहरकर यांनी पु.ल. यांच्या विविध नाटकातील पात्र साकारले. नाटकातील या दृश्यांनी श्रोत्यांना खळखळून हसविले. गदिमा आणि बाबूजी यांच्या गीत रामायण या अजरामर सादरीकरणाने कार्यक्रमाची सांगता झाली.कार्यक्रमाला दमक्षेसां केंद्राचे संचालक डॉ. दीपक खिरवडकर, कुणाल गडेकर, अल्का तेलंग आदी प्रामुख्याने उपस्थित होते. निवेदन भाग्यश्री चिटणीस यांचे होते. कार्यक्रमाच्या आयोजनात अभिजित मुळे, मकरंद भालेराव, वसंत खडसे आदींचा सहभाग होता.यादरम्यान पु.लं.ची छटा असलेल्या तीन दिवसीय चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून, त्यास नागपूरकरांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
आकाशी झेप घे रे पाखरा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 11:08 PM
पु.ल. देशपांडे, ग.दि. माडगुळकर (गदिमा) आणि सुधीर फडके ऊर्फ बाबूजी या महात्रयींच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून ‘त्रैगुण्य एक संस्मरणीय प्रवास’ या कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले. गीत, संगीत, कविता, नाट्य आणि नकलांनी सजलेल्या या कार्यक्रमाचा रसिकांनी मनमुराद आनंद लुटला.
ठळक मुद्देपु.ल., गदिमा व बाबूजी जन्मशताब्दी : सांस्कृतिक संचालनालयाचा संगीतमय सोहळा