लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : यवतमाळ येथे हाणाऱ्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित उद्घाटक साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्याच्या निर्णयाचे राज्यातच नाही तर देशभरात वादळ उठले असून साहित्य जगताकडून तीव्र पडसाद उमटत आहेत. एकीकडे बहुतेक मान्यवर सारस्वतांनी संमेलनावरच बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. अ.भा. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्या आडमुठ्या व एककल्ली कारभारामुळे ही लाजिरवाणी स्थिती उद्भवल्याची टीका करीत नैतिक जबाबदारी स्वीकारून डॉ. जोशी यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी महामंडळाचे माजी सदस्य, ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत तिडके यांनी केली.कायम तत्त्वनिष्ठ भूमिका घेऊन जगणाऱ्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या लेखिका नयनतारा सहगल यांना उद्घाटनाचे निमंत्रण द्यावे आणि संमेलनाच्या ऐन तोंडावर अशाप्रकारे निमंत्रण रद्द करून त्यांचा अपमान करण्यात आल्याने एकूणच मराठी साहित्यिकांमध्ये नाराजी आणि संताप व्यक्त होत आहे. महत्त्वाचे म्हणजे संमेलनाच्या इतिहासात लाजिरवाणी घटना घडली असताना साहित्य महामंडळ आणि स्वागत संस्था खंत व्यक्त करण्याऐवजी या पापाची जबाबदारी एकमेकांवर ढकलत चिखलफेक करण्यात मश्गूल असल्याने साहित्य क्षेत्रही ढवळून निघाले आहे. एकीकडे साहित्यिक नाराज आहेत तर दुसरीकडे नागपूरपासून मुंबईपर्यंत पडद्यामागे शिजलेल्या या घटनाक्रमाचे पाप यवतमाळच्या मातीवर लादल्याने आतापर्यंत संमेलनासाठी उत्साही असलेल्या यवतमाळकर रसिकांचाही भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळे सामान्य रसिकांच्या देणग्यांतून आयोजित झालेले हे संमेलन वाया गेले काय, ही निराशा त्यांच्यात आहे.आयोजक संस्था डॉ. वि.भि. कोलते संशोधन केंद्र व वाचनालयाचे पद्माकर मलकापुरे यांनी बॉम्बगोळा टाकत महामंडळ अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी हेच या घटनाक्रमासाठी जबाबदार असून ते हुकूमशाहसारखे वागत असल्याचा आरोपही त्यांनी केला. मलकापुरे यांच्या आरोपामुळे आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. विशेष म्हणजे संमेलनाच्या आयोजनाच्या घोषणेपासून आयोजक संस्थेमध्येच दोन गट निर्माण झाले आहेत. तसेच आयोजक व महामंडळामधले मतभेद सातत्याने समोर येत आहेत. डॉ. श्रीपाद जोशी हे हिटलरप्रमाणे वागतात, कुणाचे ऐकत नाही व कुणाला बोलू देत नसल्याचा आरोप सातत्याने आयोजक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून वारंवार केला आहे. एकीकडे आयोजक आणि महामंडळ यांच्यामध्ये वाद चालला असताना महामंडळाच्या घटकासंस्थांकडूनही महामंडळ अध्यक्षांच्या कारभारावर अनेकदा आक्षेप घेतला आहे. नयनतारा सहगल यांच्यासारख्या प्रतिभावंत लेखिकेचे निमंत्रण रद्द करणे योग्य नाही. राजकीय दबाव असला तरी ही गंभीर चूक असून यासाठी महामंडळाचे अध्यक्ष जबाबदार आहेत. त्यांची कार्यपद्धती आक्षेपार्ह आहे. त्यामुळे साहित्य संमेलनाच्या समृद्ध परंपरेला मोठा डाग लागला आहे. याची नैतिक जबाबदारी स्वीकारून डॉ. श्रीपाद जोशी यांनी राजीनामा द्यावा. श्रीकांत तिडके, ज्येष्ठ साहित्यिक. पंतप्रधान इंदिरा गांधी यांची मामेबहीण असूनही त्यांच्याविरोधात नयनतारा सहगल यांनी भूमिका घेतली होती. त्यांच्या वैचारिक पातळीच्या विरोधातील भूमिका महामंडळ व आयोजकांनी घेतली. संमेलनाच्या तोंडावर घेतलेला निर्णय लहान नाही व याविषयी घटक संस्थांशी कोणतीही चर्चा महामंडळ अध्यक्षांनी केली नाही. ही गंभीर बाब असून त्याच्या परिणामांची जाणीव महामंडळ व आयोजकांनाही नाही. यामुळे आधीच बहुतेक मान्यवर साहित्यिकांनी बहिष्कार टाकण्याचा इशारा दिल्याने हे संमेलनच धोक्यात आले आहे. कौतिकराव ठाले पाटील, मराठवाडा साहित्य संस्था.