लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील १३ सहायक प्राध्यापकांना सहयोगी प्राध्यापकपदी बढती देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अवैध ठरवून रद्द केले. न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व विनय जोशी यांनी गुरुवारी हा निर्णय जाहीर केला. त्यामुळे संबंधित प्राध्यापक व विद्यापीठाला जोरदार चपराक बसली.या निर्णयाद्वारे डॉ. मनीष लाडोळे, डॉ. मनोज मारवार, डॉ. राजेंद्र रत्नपारखी, डॉ. प्रफुल्ल गावंडे, डॉ. प्रशांत पगार, डॉ. सचिन पोटकिले, डॉ. डी. डी. मानकर, डॉ. वर्षा अपोटीकर, डॉ. विकास गौड, डॉ. प्रवीण महाटाले, डॉ. विनोद खडसे, डॉ. यू. टी. डांगोरे व डॉ. व्ही. जे. राठोड यांची बढती अवैध ठरविण्यात आली. या सहायक प्राध्यापकांना कायद्यानुसार बढती देण्यात आली नाही, असे निरीक्षण न्यायालयाने निर्णयात नोंदवले. परंतु, या प्रकरणात प्रतिवादी नसलेल्या सहयोगी प्राध्यापकांच्या बढतीच्या वैधतेवर न्यायालयाने भाष्य केले नाही. त्यांच्यासंदर्भात विद्यापीठाने कायद्यानुसार निर्णय घ्यावा, असे न्यायालयाने सांगितले. तसेच, बढतीसाठी ६ नोव्हेंबर २०१७ पर्यंत सादर झालेल्या प्रस्तावांवर त्यावेळच्या निकषानुसार निर्णय घ्यावा, असे निर्देश निवड समितीला दिले. संबंधित सहायक प्राध्यापकांना बढती देण्याच्या आदेशाविरुद्ध डॉ. आम्रपाली आखरे, डॉ. मनीष देशमुख, डॉ. संजय काकडे, वनिता खोबारकर व डॉ. शिवाजी नागपुरे यांनी रिट याचिका दाखल केल्या होत्या.