नागपूर : इच्छाशक्ती मजबूत असली की माेठ्यातली माेठी कमतरताही तुमचा मार्ग राेखू शकत नाही. ती व्यक्ती ठरविलेले ध्येय साध्य करू शकते. अकाेटचा धीरज कळसाईत हा त्याचे मूर्तिमंत उदाहरण. धीरजचा डावा हात आणि डावा पाय नाही; पण अपंगत्वाचे रडगाणे गाण्यापेक्षा ताे अवघड टास्क करीत स्वत:च्या कमतरतेला आव्हान देताे. नुकतेच धीरजने श्रीनगर ते कन्याकुमारी हे ३,६५१ किलाेमीटरचे अंतर सायकलने १३ दिवसांत पूर्ण करण्याचा विक्रम केला.
शनिवारी मार्शल राइडसाठी नागपूरला आलेल्या धीरजने आपल्या धाडसी कृतीचा अनुभव ‘लाेकमत’जवळ सांगितला. त्याचा डावा हात जन्मापासून मनगटाजवळून अपंग आहे. अशा अवस्थेत ताे गिर्याराेहण करायचा. ही कामगिरी करताना अपघातात त्याचा डावा पायही निकामी झाला. मात्र, दुर्दम्य इच्छाशक्ती बाळगणाऱ्या धीरजने हिंमत साेडली नाही की नशिबाला दाेष दिला नाही. त्याचे साहसी खेळ सुरूच राहिले.
धीरजचे आई-वडील माेलमजुरी करणारे आहेत. विज्ञान शाखेतून बारावी केलेल्या धीरजचा अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी नंबर लागला हाेता; पण पैशाअभावी ताे अभ्यासक्रम पूर्ण करू शकला नाही. मात्र, आता लाेकांचे पाठबळ मिळत असल्याने पुन्हा सीईटी देऊन इंजिनिअरिंग करण्याची जिद्द त्याने ठेवली आहे. धीरजने दिव्यांगांच्या ऑलिम्पिकमध्ये सहभागी हाेऊन देशासाठी पदक कमावण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे. सायकलिंगमुळे पायाला त्रास झाल्याने मार्शल राइडच्या निमित्ताने उपचारासाठी ताे नागपूरला आला हाेता.
दरराेज ३०० किमीचा प्रवास
धीरजने १ मार्चपासून श्रीनगर येथून त्याचा सायकल प्रवास सुरू केला हाेता. साेबत मदतीकरिता टीम लीडर रजिक अली, अर्चना गुडधे, विशाल सुभेदार व विशाल गिरी हाेते. दरराेज ३०० किमीचा प्रवास करायचा व पेट्राेल पंपावर थांबायचे, असा नित्यक्रम. देशातील १२ राज्यांच्या २५ शहरांमधून प्रवास करीत १३ मार्च राेजी त्याने कन्याकुमारी गाठले. ऊन, वारा, पाऊस, थंडी अशा हवामानाच्या अडथळ्यांचा सामना करीत त्याने आपले ध्येय पूर्ण केले.
याआधी गिर्याराेहणाचे विक्रम
धीरजने यापूर्वी महाराष्ट्रातील सर्वाेच्च कळसूबाई शिखर व इतर गड किल्ले सर केले आहेत. आंतरराष्ट्रीय गिर्याराेहक म्हणून त्याने २०१९ साली रशियामधील माउंट एल्बूज व दक्षिण आफ्रिकेतील किलीमंजाराे हे हिमशिखर सर करून तिरंगा फडकवला. या विक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉड व महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाेंद झाली आहे.