नागपूर : अक्षय तृतीया आणि ईद एकाच दिवशी आल्याने पोलिसांनी शहरात चोख बंदोबस्त लावला आहे. भोंग्यांच्या मुद्द्यावरून निर्माण झालेले राजकारण आणि त्यामुळे बिघडलेले वातावरण लक्षात घेता पोलिसांनी शहरातील विशिष्ट भागात कडक बंदोबस्त लावला आहे.
या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. शहरात २८० मशिदी आहेत. त्यामुळे कोणत्या ठिकाणी किती पोलीस बंदोबस्तासाठी ठेवायचे, त्याचे नियोजन करण्यात आले. पोलिसांच्या मदतीला एसआरपीएफ आणि होमगार्ड असा एकूण साडेतीन हजारांचा ताफा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आला.
गर्दीची ठिकाणं, मुस्लीमबहुल वस्त्यांमध्ये सोमवारी सायंकाळपासूनच बंदोबस्त वाढविण्यात आला. शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना सतर्कतेचे आदेश देऊन गुन्हेगारी तसेच उपद्रवी वृत्तीच्या व्यक्तींविरुद्ध कडक कारवाईचे आदेश देण्यात आले.