लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : साडेतीन मुहूर्तापैकी अर्धा मुहूर्त असलेला अक्षय्यतृतीया सण यंदा खरेदीविना जाणार आहे. स्टॉकमध्ये असलेल्या मालाची विक्री कशी करायची, यावर सर्व व्यावसायिक चिंतेत आहेत. त्यांना लॉकडाऊन हटल्यानंतरच दुकाने सुरू होण्याची अपेक्षा आहे. गुढीपाडवा आणि अक्षय्यतृतीयेला होणारी कोट्यवधींची विक्री ठप्प झाली असली तरीही लॉकडाऊननंतर नव्याने व्यवसाय करू, असा विश्वास व्यावसायिकांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.अक्षय्यतृतीया रविवारी आहे. भारतीय संस्कृतीत गुढीपाडवा, दसरा, दिवाळी हे तीन मुहूर्त आणि अक्षय्यतृतीयेचा अर्धा मुहूर्त असतो. या दिवशी नवीन वस्तू आणि सोन्याची खरेदी तसेच गृहप्रवेश शुभ समजला जातो. या दिवशी पूर्वजांचे पूजन करण्यात येते. पण यंदा कोरोना लॉकडाऊनमुळे सर्वच सणांवर संकट आले आहे. लॉकडाऊनमुळे गुढीपाडवा सणही मुहूर्ताविना गेला.श्रीकांत इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक श्रीकांत भांडारकर म्हणाले, तसे पाहता संपूर्ण वर्षातील ३० ते ४० टक्के व्यवसाय हा गुढीपाडवा ते १५ जूनपर्यंत होतो. पण यावर्षी गुढीपाडवा सण व्यवसायाविना गेला. तेव्हापासूनच चिंतेचे सावट व्यवसायावर आले आहे. अक्षय्यतृतीया या शुभदिनी बहुतांश लोक नवीन वस्तूची खरेदी करतात. पण शोरूम बंद असल्याने कुठलीही खरेदी-विक्री होणार नाही. भांडारकर म्हणाले, कोरोनामुळे सर्व इलेक्ट्रॉनिक्स व्यावसायिक संकटात आहेत. बँकांचे कर्जावरील व्याज वाढत आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारासह बँकेच्या कर्जाचे व्याज व हप्ते वाढत आहेत. चोहोबाजूने आलेल्या संकटावर मात करण्याची आमची तयारी आहे. पुढील महिन्यात शुभसंकेताची अपेक्षा आहे.क्रेडाई नागपूर मेट्रोचे सचिव गौरव अगरवाला म्हणाले, अक्षय्यतृतीयेला लोक घराचे बुकिंग करतात. शिवाय अनेकजण गृहप्रवेश याच दिवशी करतात. त्या निमित्ताने साजरा होणाºया कार्यक्रमात येणाºया लोकांकडून घराची विचारणा होत असल्याने बिल्डर्सला बुकिंगची अपेक्षा असते. यावर्षी गुढीपाडवा उत्सवाविना गेला, त्याप्रमाणेच अक्षय्यतृतीयाही जाणार आहे. या दिवशी बुकिंगची अपेक्षा करणे शक्य नाही. नवीन प्रकल्पही रखडले आहेत. बिल्डर्स आर्थिक संकटात आहे. शासनाने दिलासा द्यावा, अशी क्रेडाईची मागणी आहे.
अक्षय्यतृतीयेला नागपुरातील कोट्यवधींची उलाढाल ठप्प : व्यावसायिकांना आर्थिक चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 1:17 AM
साडेतीन मुहूर्तापैकी अर्धा मुहूर्त असलेला अक्षय्यतृतीया सण यंदा खरेदीविना जाणार आहे. स्टॉकमध्ये असलेल्या मालाची विक्री कशी करायची, यावर सर्व व्यावसायिक चिंतेत आहेत.
ठळक मुद्दे गुढीपाडवाही कोरडाच