लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हिंदू संस्कृतीतील साडेतीन मुहूर्तापैकी एक म्हणून अक्षयतृतीया या दिवसाला विशेष महत्त्व आहे. हा दिवस शुभ दिवस मानला जातो. त्यामुळे या दिवशी कोणत्याही गोष्टींची खरेदी शुभ मानली जाते. नवीन भूखंड, घर, दुचाकी किंवा चारचाकी वाहन, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू व सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करण्याला प्राधान्य दिले जाते. या शुभ मुहूर्ताचा उत्साह मंगळवारी उपराजधानीच्या बाजारात दिसून आला. यानिमित्त सराफा बाजारात सोने चांदीचे दागिने खरेदी करण्यासाठी चांगलीच रेलचेल होती. दुसरीकडे इलेक्ट्रॉनिक्स मार्केट व नवीन वाहन खरेदीसाठीही लोकांनी गर्दी केली. त्यामुळे व्यापारामध्ये चांगली धनवर्षा झाल्याचे बोलले जात आहे.शहरातील प्रतिष्ठित सराफा व्यावसायिक रोकडे ज्वेलर्सचे राजेश रोकडे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, यावर्षी अक्षयतृतीयेला अपेक्षेपेक्षा अधिक उत्साह दिसून येत आहे. या दिवशी शक्यतो एक ग्रॅम तरी सोने खरेदी करण्याला महत्त्व दिले जाते. त्यामुळे मंगळवारी सराफा बाजारात सकाळपासून लोकांची गर्दी होती व ही रेलचेल दिवसभर सुरू होती. ग्राहकांनी यावेळी चांगली खरेदी केली. शिवाय लग्नसराई सुरू असल्याने या शुभ मुहूर्तावर सोने खरेदीला लोकांची पसंती अधिक असते. या लग्नसराईचा उत्साह बाजारात होता. शहरात तीन हजाराहून अधिक सराफा दुकाने आहेत. लग्नसराईनिमित्त नव्या आणि आकर्षक डिझाईनच्या दागिन्यांचे कलेक्शन सराफा व्यावसायिकांनी आणले होते. या नव्या डिझाईनच्या दागिने खरेदीवर ग्राहकांचा कल अधिक होता व व्यापाऱ्यांना अक्षयतृतीया मुहूर्ताचा चांगला लाभ मिळाला. निश्चित आकडा सांगता येत नसला तरी सराफा बाजारात कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.दुसरीकडे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि वाहनांच्या खरेदीसाठीही लोकांचा कल अधिक होता. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स मार्केट व वाहनांच्या शोरू ममध्येही दिवसभर ग्राहकांची चांगलीच गर्दी दिसून आली. येथे आधीच बुक केलेल्या वाहनांची अक्षयतृतीयेला डिलीव्हरी करण्यात आली. नागरिकांनी दुचाकी व चारचाकी वाहनांची खरेदी केली. याशिवाय इतवारीतील भांडेओळ आणि सीताबर्डीच्या मोबाईल मार्केटमध्येही लोकांची रेलचेल दिसून आली. व्यावसायिकांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तूंवर वेगवेगळ्या ऑफर्स दिल्या होत्या. काहींनी या दिवशी नवीन भूखंड व घरे खरेदीला प्राधान्य दिले. ज्यांना शक्य आहे अशांचा रोख फ्लॅट किंवा भूखंड खरेदीच्या व्यवहाराकडे होता.त्यासाठी बिल्डर्स व प्लॉट व्यावसायिकांनी यानिमित्त आकर्षक ऑफर्स देऊ केल्या होत्या. गारमेंट्स खरेदीवरही लोकांचा भर होता. लग्नसमारंभांचा उत्साह पाहता लग्नाची शेरवानी, वधूचा लेहंगा, सुट आदींची जोरदार विक्री झाली. एकूणच विविध क्षेत्रातील व्यापाऱ्यांसाठी अक्षयतृतीयेचा दिवस उत्साह वाढविणारा ठरला.
क्रेडिट कार्ड, एटीएम व चेकने खरेदी दरम्यान गेल्या काही महिन्यात कॅशलेस व्यवहार करण्याकडे ग्राहकांचे प्राधान्य वाढले आहे. शिवाय एटीएममध्ये वेळेवर कॅश मिळत नसल्यानेही ग्राहकांना अडचण होत होती. त्यामुळे एटीएम कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा चेकद्वारे दागिने व वाहनांचे पैसे चुकते करण्यावर ग्राहकांचा अधिक भर दिसून आला. कुठल्याही व्यवहाराने असो, व्यापाऱ्यांसाठी हा दिवस चांदी करणाराच होता.