लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : घरपोच वितरणासाठी जवळ बाळगलेल्या दारूचे प्रमाण मर्यादेत आढळून आल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने डिलेव्हरी बॉयविरुद्धचा अवैध एफआयआर रद्द केला. न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व गोविंद सानप यांनी हा निर्णय दिला.
२४ डिसेंबर २०२० रोजी गुन्हे शाखेला एक डिलेव्हरी बॉय कायदेशीर मर्यादेपेक्षा जास्त दारू घरपोच वितरणासाठी घेऊन जात असल्याची खबऱ्याकडून माहिती मिळाली होती. त्यावरून गुन्हे शाखा पोलिसांनी काचिपुरा चौकात सापळा रचून चंद्रशेखर शुक्ला या डिलेव्हरी बॉयला ताब्यात घेतले. दरम्यान, त्याच्याकडील बॅगमध्ये विदेशी दारूच्या १५ बाटल्या आढळून आल्या. दारुबंदी कायद्यातील तरतूद, संबंधित नियम व शासन आदेशानुसार त्यावेळी घरपोच वितरणासाठी १२ युनिटपर्यंत दारू जवळ बाळगण्याची परवानगी होती. एक युनिटमध्ये १००० मिली दारूचा समावेश होतो. त्यामुळे १२ हजार मिली दारू जवळ बाळगणे कायदेशीर होते. परंतु, गुन्हे शाखा पोलिसांनी दारूचे प्रमाण मोजताना गल्लत केली. शुक्लाकडील १५ बाटल्यांमधील एकूण दारू ११ हजार ५०० मिली असताना त्याच्याविरुद्ध २५ डिसेंबर २०२० रोजी बजाजनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली. त्यावरून शुक्लाविरुद्ध दारुबंदी कायद्यातील कलम ६५(ई) अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला. तो एफआयआर रद्द करण्यासाठी शुक्लाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने कायदेशीर तरतुदी लक्षात घेता ती याचिका मंजूर केली. शुक्ला कायदेशीर प्रमाणातच दारु वाहतूक करीत होता असे निर्णयात स्पष्ट करण्यात आले.