लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणूने देशभरात थैमान घातले आहे. मार्चपासून देशभरात सरसकट लॉकडाऊन करण्यात आले. नंतर जूनपासून अनलॉकच्या प्रक्रियेला शासनाने सुरुवात करून दारूच्या दुकानांना परवानगी दिली. ज्यापासून शासनाला महसूल प्राप्त होतो अशा सर्व गोष्टी टप्प्याटप्प्याने सुरू केल्या. परंतु मानवाची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यात सिंहाचा वाटा असलेल्या जीम व्यवसायाला मात्र शासनाने परवानगी नाकारली. त्यामुळे जीम व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या जीम चालक, कर्मचारी यांच्या परिवारावर मोठा अन्याय झाला आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी जीम चालक-मालकांनी लोकमत चौक ते संविधान चौक दरम्यान अर्धनग्न मूक मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधले आणि दारु चांगली की जीम, असा प्रश्न उपस्थित केला.राज्यातील बहुतांश जीम मालक व कर्मचाऱ्यांचे रोजगाराचे एकमेव साधन म्हणजे फक्त जीम व्यवसाय आहे. आता हा व्यवसायच मार्चमहिन्यापासून बंद असल्याने जीम चालकांवर कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे. जीमचे भाडे, वीज बिल, कर्जाचे हप्ते, यामुळे जीम चालक पूर्णत: उद्ध्वस्त झाले असून, अनेकांपुढे आत्महत्या करण्यापासून पर्याय उरलेला नाही. तेव्हा शासनाने सावत्रपणाची वागणूक न करता जीम व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केली. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला सादर करण्यात आले.आंदोलनात रवींद्र दंतलवार, आदेश नगराळे, रवी मेंढे यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या मोर्चात गणेश रामगुंडेवार, आदित्य बालपांडे, सचिन भगत, रोहित शाहू, कुलदीप चिकाटे, राकेश झाडे, रवी जोशी, नागेश ढोबळे, सतीश साठवणे, अक्की पोहनकर, मंगेश गुलाईत, अनिकेत गेडाम, अभिजित गावंडे, आकाश भेदे आदी सहभागी झाले होते.
दारू महत्त्वाची की जीम : अर्धनग्न मूकमोर्चाद्वारे वेधले लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 9:39 PM
बुधवारी जीम चालक-मालकांनी लोकमत चौक ते संविधान चौक दरम्यान अर्धनग्न मूक मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधले आणि दारु चांगली की जीम, असा प्रश्न उपस्थित केला.
ठळक मुद्देजीम चालक-मालकांचा सवाल