लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : यवतमाळ, बुलडाणा, वाशीम, भंडारा, गोंदिया व अकोला या जिल्ह्यामध्ये मतमोजणीच्या दिवशी, म्हणजे २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजतानंतर दारू विक्रीला परवानगी देण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला. संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी २४ ऑक्टोबर रोजी मद्यविक्रीस मनाई केली होती. त्याविरुद्ध महाराष्ट्र वाईन मर्चंट असोसिएशनने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सुनावणीनंतर न्यायालयाने मतमोजणी प्रक्रिया सायंकाळपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता लक्षात घेता वरील आदेश दिला. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. साहिल देवानी यांनी कामकाज पाहिले.आदर्श आचारसंहिता कालावधीत मतदानाच्या ४८ तासांपूर्वी म्हणजे १९ ते प्रत्यक्ष मतदानादिनी २१ ऑक्टोबर दरम्यान आणि मतमोजणीच्या दिवशी २४ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यात मद्यविक्री न करता कोरडा दिवस (ड्राय डे) पाळण्याचे निर्देश अनुज्ञप्तीधारकांना दिले होते. जिल्ह्यात सर्व मद्यविक्री अनुज्ञप्तीधारकांनी त्यांच्या निवडणूक क्षेत्रातील देशी व विदेशी तसेच इतर अनुज्ञपत्या मद्यविक्रीसाठी बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले होते.
मतमोजणी दिवशी सायंकाळपासून दारू विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 10:59 AM