लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दुचाकीने दारू तस्करी करीत असलेल्या एका युवकास बजाजनगर पोलिसांनी रंगेहात पकडले. त्याच्याजवळून १५ हजार रुपये किमतीची दारू जप्त करण्यात आली. राजा विश्वंभर प्रसाद मिश्रा (२९) रा. गंगानगर, काटोल रोड असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणात १२ तासानंतर दारू दुकानाच्या संचालकाविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला.
राजा हा मंगळवारी साायंकाळी ५ वाजता एमएच-३१-डीजी-९११० या क्रमांकाच्या दुचाकीने जात होता. राजा हा बजाजनगर चौकातील पीव्हीके वाईन शॉप येथून दारू तस्करीसाठी नेत असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी राजाला शंकरनगर उद्यानाजवळ रोखले. त्याच्या दुचाकीवर दारूची पेटी होती. त्यात १५ हजार रुपये किमतीच्या दारूच्या ९० बॉटल होत्या. पाेलिसांनी राजाला तााब्यात घेऊन दारू जप्त केली. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी विचारपूस केली तेव्हा राजाने पीव्हीके वाईन शॉप येथून दारू खरेदी केल्याचे सांगितले. नियमानुसार वाईन शॉप डिलिव्हरी बॉयला २४ बॉटल घेऊन जाण्याची परवानगी आहे. यासाठीसुद्धा प्रक्रिया पूर्ण करावी लागते. ९० बॉटल सापडल्याने यात दारू दुकानाच्या संचालकाची भूमिकाही संशयास्पद दिसून येत होती. यानंतरही पाोलिसांनी केवळ राजाविरुद्ध गुन्हा दाखल केला. दारू दुकानाच्या संचाालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला नाही. आज सकाळी वरिष्ठ अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती मिळाली. तेव्हा त्यांनी यासंदर्भात निर्देश दिले. तेव्हा पोलिसांनी पीव्हीके वाईन शॉपच्या संचालक व व्यवस्थापकालाही आरोपी बनविले.