लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चॉकलेटचे आमिष दाखवून दोन चिमुकल्यांचे एका आरोपीने अपहरण केले. त्यांना सुरादेवीच्या जंगलात नेले. सुदैवाने अपहरणकर्ता मुलीच्या आजीच्या नजरेस पडला. त्यामुळे त्यांनी आरडाओरड करून वस्तीतील नागरिकांना माहिती दिली. त्यानंतर मुलीच्या काकाने प्रसंगावधान राखत त्याचा पाठलाग केल्यामुळे आरोपीने या बालकांना जंगलात सोडून पळ काढला. परिणामी एक मोठा गुन्हा टळला. दोन्ही बालके सुखरूप असून, पोलिसांनी अपहरण करणारा आरोपी दिलबागसिंग सुच्चासिंग गिल (वय ३२) याला अटक केली. तो फ्रेण्डस मिलच्या मागे पांझरा गावात राहतो.विशेष म्हणजे, शुक्रवारी दुपारी घडलेल्या या घटनेबाबत कोराडी पोलिसांनी दोन दिवस कमालीची गोपनीयता बाळगली. आरोपी मिळाल्यानंतर रविवारी दुपारी या प्रकरणाची माहिती जाहीर करण्यात आली. कोराडी, महादुला येथील श्रीवासनगर, सेवानंद शाळेच्या मागे राणी राजकुमार बावनकर (वय ३०) राहतात. त्यांची पाच वर्षीय चिमुकली निधी आणि लक्ष्मीबाई लावापुरे यांचा दीड वर्षांचा नातू दद्दू शुक्रवारी दुपारी १ वाजता खेळत होते. तेवढ्यात तेथे आरोपी दिलबागसिंग आला. त्याने या दोघांना चॉकलेट घेऊन देतो, असे म्हणून आपल्या दुचाकीवर बसवले. नेमक्या वेळी निधीच्या आजीचे त्याच्याकडे लक्ष गेले. त्यामुळे त्यांनी आरडाओरड केली. निधीच्या काकाने काय घटना झाली, ते विचारले अन् लगेच आरोपी ज्या दिशेने पळाला त्या भागात दुचाकीने धाव घेतली. इकडे दोन चिमुकल्यांचे अपहरण झाल्याच्या वृत्ताने महादुला भागात प्रचंड खळबळ उडाली. तिकडे विविध भागात फिरवत दोन तासानंतर आरोपी सुरादेवीच्या जंगलात गेला. आपला पाठलाग केला जात असल्याची कल्पना आल्याने त्याने रणरणत्या उन्हात दोन्ही चिमुकल्यांना दुचाकीवरून खाली उतरवून पळ काढला. प्रचंड घाबरलेले निधी आणि दद्दू जोरजोरात रडू लागले. त्यांचा आवाज ऐकून निधीचे काका तेथे पोहचले. बाजूच्या निर्माणाधीन ठिकाणचे सुरक्षा रक्षक, निधीचे वडील अन् परिसरातील नागरिकही पोहचले आणि त्यांनी निधी व दद्दूला ताब्यात घेतले. दरम्यान, या घटनेची माहिती कोराडी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी लगेच धावपळ करून आरोपी दिलबागसिंगच्या मुसक्या बांधल्या.
काय होते मनसुबे ?आरोपीला अटक केल्यानंतर पोलिसांनी मुलांच्या अपहरणामागचा इरादा जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने त्याबाबत माहिती दिली नाही. सहज फिरवण्यासाठी नेले होते, असे तो म्हणाला. मात्र, दुपारी १ ते ३ असे तब्बल दोन तास मुलांना इकडेतिकडे फिरविल्यानंतर तो सुरादेवी जंगलाकडे कशाला गेला होता, याची माहिती वदवून घेण्यात पोलिसांना यश आले नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपी दिलबागसिंग हा जादुटोणा (अंगारे धुपारे) करून लकवाग्रस्त रुग्णांचा उपचार करतो. या भागात राहणाऱ्या हुमणे नामक महिलेवर उपचार सुरू असल्याने गेल्या काही दिवसांपासून तो महादुल्यात येत होता. दोन चिमुकल्यांचे त्याने अपहरण कोणत्या कारणामुळे केले, त्यासंबंधाने उलटसुलट चर्चा सुरू आहे.