नागपूर : महानगरपालिकेतील २२ वर्षे जुन्या लाखो रुपयांच्या क्रीडा साहित्य खरेदी व वितरण घोटाळा खटल्यावरील बहुप्रतीक्षित निर्णय मंगळवारी जाहीर करण्यात आला. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एन. जी. देशपांडे यांनी सबळ पुरावे आढळून न आल्यामुळे घोटाळ्यातील सर्व आरोपींना निर्दोष सोडले. सरकार पक्षाला एकही आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध करता आला नाही.
या घोटाळ्यात आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, माजी महापौर कल्पना पांडे, अर्चना डेहनकर, दयाशंकर तिवारी, तत्कालीन अतिरिक्त उपायुक्त साहेबराव राऊत, प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा बनारसी, क्रीडा निरीक्षक हंबीरराव मोहिते यांच्यासह एकूण १०८ आरोपींचा समावेश होता. हा खटला प्रलंबित असताना तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी विनायक चौधरी, तत्कालीन नगरसेवक जगदीश ग्वालबंशी, किशोर गजभिये, सरदारीलाल सोनी, देवा उसरे, राजू बहादुरे, सुलभा दाणी आदींचा मृत्यू झाला. त्यामुळे केवळ हयातीत असलेल्या आरोपींच्या बाबतीत हा निर्णय देण्यात आला आहे.
नंदलाल समितीने केली होती चौकशी
हा घोटाळा २००० मध्ये उघडकीस आला होता. त्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ माजली होती. त्यावेळी टी. चंद्रशेखर महानगरपालिका आयुक्त होते. महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीची तर, राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी महसूल व वन विभागाचे प्रधान सचिव नंदलाल यांची नियुक्ती केली होती. नंदलाल यांनी २ कोटी ३८ लाख ३९ हजार १७७ रुपयांचे क्रीडा साहित्य खरेदी व वितरण व्यवहारात भ्रष्टाचार झाल्याचा अहवाल दिला. त्यामुळे ६ जानेवारी २००१ रोजी सदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. आरोपींच्या वतीने ॲड. चंद्रशेखर चलतारे, ॲड. उदय डबले, ॲड. लुबेश मेश्राम, ॲड. सुभाष घारे व ॲड. प्रफुल्ल मोहगावकर यांनी बाजू मांडली.
इतर आरोपी नगरसेवकांमध्ये यांचा समावेश होता
दिलीप पनकुले, प्रमोद पेंडके, राजेंद्र लोखंडे, विक्रम पनकुले, जगदीश कंबाले, दत्तू थेटे, अशोक मोटघरे, चंद्रकला पारधे, मुन्ना शुक्ला, शरद देवगन, नारायण आरसपुरे, विमल धावडे, शीला मुंदाळे, शिवशंकर धात्रक, भास्कर पांडे, मंदा भुसारी, हाजी कुरैशी, रमेश चोपडे, सुबोध बघेल, मार्टीन मोरीस, अब्दुल हमीद अंसारी, काशीराम देवगडे, कमल मोहाडीकर, अलका इंगळे, बहीरीनबाई सोनबोईर, कृष्णकुमार सूर्यवंशी, यशवंत मेश्राम, अब्दुल माजीत ऊर्फ शोला, मधुकर महाकाळकर, दिगांबर धांडे, मालती मामीडवार, रमेश शिंगारे, सुमित्रा जाधव, मनीषा दलाल, दामोदर कन्हेरे, दिलीप मडावी, सुजाता काळे, नीलिमा शुक्ला, चंद्रशेखर बावनकर, मनोहर थुल, वर्षा टेंभुरकर, प्रवीण चौरे, कुसुम सोरदे, रमा फुलझेले, धरमकुमार पाटील, कृष्णा गजभिये, जिजाबाई धकाते, सिंधू डेहलिकर, विठ्ठल महाजन, अनिल धावडे, मधुकर धाते, बलवंत जिचकार, रज्जत चावरिया, नीलिमा गडीकर, वसुंधरा मासुरकर, रतन बैसवारे, कल्याणसिंग कपूर, प्रभाकर येवले, शांताकला वाघमारे, ऊर्मिला गौर, विठ्ठल हेडाऊ, ताराबाई आंबुलकर, चंद्रकांत मेहर, श्रावण तारणेकर, माया भोसकर, सुनंदा नाल्हे, रेखा राऊत, संजय हेजीब, सुनीता सहारे, जैतून बी, अब्दुल जलील चौधरी, मो. याकुब कुमार, कुंदा मडावी, किशोर पराते, शंकर पाठराबे, कल्पना पत्राळे, विजय बाभरे, सविता भारद्वाज, शमिम बानो, मधुकर तंबाखे, मो. कलाम, झुल्फिकार अहमद, सुभाष राऊत, मिलिंद गाणार, नरसिंगदास मंत्री, संजय शहा, शंकर अग्रवाल, मो. असलम, विजय पारवे, अश्फाक पटेल अंसारी, गुलाबसिंग दिवान, दिलीप चौधरी, शुभदा खारपाटे.