नागपूर : कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महाल येथील राणा सन बारसमोर झालेल्या एका तरुणाच्या खून प्रकरणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर सोनवणे यांच्या न्यायालयाने सबळ पुराव्या अभावी संशयाचा लाभ देत शुक्रवारी सर्वच चारही आरोपींची निर्दोष सुटका केली. या खून खटल्यातील चारही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार फितूर झाले होते. विश्वजित ऊर्फ सोनू जाधव रा. कर्नलबाग, सीताराम शाहू रा. लालगंज, रंजीश ऊर्फ रॉकी जाधव रा. सोमवारीपेठ आणि आशिष शिर्के रा. महाल, अशी आरोपींची नावे आहेत. राहुल ऊर्फ रानू विनोदराव गाढवे रा. सिरसपेठ तेलीपुरा, असे मृताचे नाव होते. सरकार पक्षानुसार खुनाची घटना २० मे २०१३ रोजी रात्री ९.४५ वाजताच्या सुमारास घडली होती. जुन्या वैमनस्यातून रॉकीने आपल्या दुचाकी वाहनावर राहुल गाढवे याला बसवून राणा सन समोर आणले होते. त्यानंतर रॉकी आणि त्याच्या साथीदारांनी चाकू आणि सुरीने वार करीत त्याचा खून केला होता. मृताचा भाऊ वैभव गाढवे याच्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून चारही आरोपींना अटक केली होती. या प्रकरणाचा तपास चंद्रकांत निरावडे यांनी करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात एकूण ११ साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी चार प्रत्यक्षदर्शी साक्षीदार फितूर झाले होते. आरोपींनी आपणासमक्ष राहुल गाढवे याला मारले नाही. आरोपी त्याला मारत असल्याचे आम्ही पाहिलेही नाही, असे त्यांनी साक्ष देताना न्यायालयाला सांगितले होते. संशयाचा लाभ मिळून आरोपी निर्दोष ठरले. न्यायालयात बचाव पक्षाच्या वतीने अॅड. चंद्रशेखर जलतारे, अॅड. डी. एस. श्रीमाळी आणि अॅड. चेतन ठाकूर यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)
खुनातील सर्व आरोपी निर्दोष
By admin | Published: March 29, 2015 2:33 AM