लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : जिल्ह्यातील पुसद येथे बँकेतून काढलेली व्यापाऱ्याची ५ लाख रुपयांची रक्कम चोरट्याने मोठ्या चलाखीने उडविली . ही घटना आयसीआयसीआय बँक परिसरात घडली असून ती सीसीटीव्हीत कैद झाली आहे . पुसद शहरातील आडते व्यापारी किशोर नंदलाल तोष्णीवाल यांचे आयसीआयसीआय बँकेत खाते आहे . त्यांचा नौकर श्रीरंग ग्यानबा ढोकणे हा नेहमी याच बँकेचा व्यवहार करतो. बऱ्याच दिवसापासुन चोरी करणारे त्यांच्या मागावर होते. आज ढोकणे नेहमीप्रमाणे बँकेत पैसे काढून तोष्णीवालकडे ५ लाख रुपये पोहचविण्यासाठी बँकेच्या समोर आले . मोटरसायकलची डिक्की खोलली आणि त्यामध्ये पैसे ठेवत असतांना अचानक अज्ञात इसम तेथे आला आणि त्यांनी आपले १०० रू. खाली पडले आहेत असे म्हणताच ढोकणे १०० रु. घेण्यासाठी खाली वाकले, तेव्हा दोन मोटारसाकलवर चार इसम त्या ठिकाणी आले आणि ५ लाख रुपये घेवून पसार झाले. ढोकणे यांनी आरडा ओरड केल्या नंतर चोरटे धुम ठोकुन पसार झाले. दिवसाढवळ्या लूटमार झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे . पुसद पोलीस अधिक तपास करीत आहेत .
भरदिवसा व्यापाऱ्याला पाच लाख रुपयाने लुटले, आरोपी सीसीटीव्हीत कैद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 10:48 AM