नंदा जिचकार : महापौरपदाचा पदभार स्वीकारलानागपूर: पक्ष नेतृत्वाने माझ्यावर महापौरपदाची मोठी जबाबदारी सोपविली आहे. त्यांच्या मार्गदर्शनात पदाधिकारी, अधिकारी व नगरसेवक अशा सर्वांची साथ घेऊ न पारदर्शक कारभाराच्या माध्यमातून शहराचा चौफेर विकास करू, अशी ग्वाही महापौर नंदा जिचकार यांनी सोमवारी दिली. महापालिका मुख्यालयाच्या हिरवळीवर आयोजित महापौर पदग्रहण समारंभात त्या बोलत होत्या. व्यासपीठावर भाजपाचे शहर अध्यक्ष आ. सुधाकर कोहळे, सुधाकर देशमुख, अनिल सोले, विकास कुंभारे, उपमहापौर दीपराज पार्डीकर, सत्तापक्षनेते संदीप जोशी, माजी महापौर प्रवीण दटके, माजी उपमहापौर सतीश होले, माजी सत्तापक्षनेते दयाशंकर तिवारी, आयुक्त श्रावण हर्डीकर, स्थायी समितीचे भावी अध्यक्ष संदीप जाधव, बसपाचे गटनेते मोहम्मद जमाल आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी जो विकासाचा मार्ग दाखविला. त्यानुसार सर्व नगरसेवक व पदाधिकारी उत्तम काम करून जनतेची सेवा करतील. सोपविलेली जबाबदारी सक्षमपणे पार पाडतील अशी ग्वाही जिचकार यांनी दिली. आरक्षणामुळे मिळालेल्या संधीचे सोने करीत महापालिकेत महिला मोठ्या प्रमाणात निवडून आलेल्या आहेत. पक्ष संघटनेत काम करणाऱ्यांना पदाची संधी मिळते. त्यामुळे पक्षसंघटनेतही मन लावून काम करा, असे आवाहन जिचकार यांनी भाजपाच्या नगरसेवकांना केले.गेल्या दहा वर्षात महापालिकेतील सत्तेच्या माध्यमातून भाजपाने शहरातील ४० लाख जनतेची प्रामाणिक सेवा केली. यावर विश्वास दर्शवून जनतेने पक्षाच्या १०८ नगरसेवकांना निवडून दिले. या विश्वासाला तडा जाणार नाही अशी ग्वाही सुधाकर कोहळे यांनी दिली. पक्षाने सोपविलेली जबाबदारी उत्तमपणे पार पाडणाऱ्यांना पक्षाने पदे दिलेली आहे. नंदा जिचकार भाजपाच्या शहर महिला आघाडीच्या अध्यक्ष आहेत. सत्तापक्षनेते संदीप जोशी व स्थायी समितीचे भावी अध्यक्ष संदीप जाधव भाजपाचे शहर महामंत्री आहेत. महापालिकेतील पदाधिकारी व नगरसेवक परिश्रम घेऊ न महापालिकेच्या पारदर्शी कारभाराच्या माध्यमातून नागपूर शहराला देशातील एक उत्तम शहर करतील, असा विश्वास कोहळे यांनी व्यक्त केला.उपमहापौर दीपराज पार्डीकर यांनीही विचार मांडले. सत्तापक्षनते संदीप जोशी यांनी आभार प्रदर्शनातून शहर विकासाची ग्वाही दिली. नगरसेविका दिव्या घुरडे यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. (प्रतिनिधी)असे झाले पदग्रहण जाहीर पदग्रहण समारंभापूर्वी महापौर नंदा जिचकार यांनी मावळते महापौर प्रवीण दटके यांच्याकडून पदभार स्वीकारला. तसेच उपमहापौर दीपराज पार्डीकर यांनी मावळते उपमहापौर सतीश होले यांच्याकडून तर सत्तापक्षनेते संदीप जोशी यांनी दयाशंकर तिवारी यांच्याकडून पदाची सूत्रे स्वीकारली. भाजपाचे शहर अध्यक्ष आ. सुधाकर कोहळे व प्रवीण दटके यांनी नंदा जिचकार यांचे स्वागत केले. यावेळी आमदार व पदाधिकारी उपस्थित होते. पाच माजी महापौर व्यासपीठावरनंदा जिचकार यांच्या पदग्रहण समारंभाला व्यासपीठावर पाच माजी महापौर उपस्थित होते. यात प्रवीण दटके यांच्यासह माया इवनाते, अर्चना डेहनकर, पुष्पा घोडे व वसुंधरा मसूरकर आदींचा समावेश होता. महापौरपदी महिलेला संधी मिळाल्याने चार माजी महिला महापौर आवर्जून उपस्थित होत्या. स्थायी समिती अध्यक्षांची १० मार्चला निवडमहापालिके च्या स्थायी समिती अध्यक्षांची निवड १० मार्चला केली जाणार असल्याची माहिती सत्तापक्षनेते संदीप जोशी यांनी दिली. या पदासाठी माजी उपमहापौर संदीप जाधव यांच्या नावाची आधीच घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे ही निवड एक औपचारिकता ठरणार आहे.
सर्वांची साथ, शहराचा विकास
By admin | Published: March 07, 2017 1:57 AM