अमित शाह यांचे संकेत : सरसंघचालकांची घेतली भेटलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भाजपाचे केंद्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी सोमवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात जाऊन सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांची भेट घेतली. या भेटीअगोदर त्यांनी भाजपाचे आमदार व पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. गावपातळीवर पक्षसंघटना मजबूत करण्याची सूचना देत असताना २०२४ साली लोकसभा, विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रच होण्याची शक्यता असल्याचे संकेत दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.शाह सध्या देशातील विविध भागांना भेटी देऊन स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत आहेत. भाजपातर्फे १ जूनपासून विस्तारक योजना राबविण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर अमित शाह यांचा अचानक नागपूर दौरा ठरला.नागपुरात येताच शाह यांनी अगोदर नागपुरातील आमदार, पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा.अजय संचेती हेदेखील उपस्थित होते. नागपूर व विदर्भातील पक्षविस्तारासंदर्भात त्यांनी पदाधिकाऱ्यांकडून जाणून घेतले. तसेच त्यांना विविध सूचना केल्या. २०१९ च्या निवडणुकांसोबतच २०२४ च्या टप्प्याकडे लक्ष देऊन पक्षबांधणीला लागा, अशी सूचना केली. लोकसभा, विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र होण्याची शक्यता आहे का असा प्रश्न नागपुरातील पदाधिकाऱ्यांनी शहा यांना केला. एकत्र निवडणुका घेणे शक्य आहे. मात्र लोकसभेसोबतच इतर निवडणुका घेण्यासाठी सर्वांची कालमर्यादा विचारात घ्यावी लागले. ही मोठी प्रक्रिया आहे. ती होईल तेव्हा होईल. मात्र असे झालेच तर आपली तयारी हवी या दृष्टीने संघटन बांधणी करायला हवी, असे शाह यांनी सांगितले, अशी माहिती सूत्रांनी दिली. याबाबत भाजपाचे शहराध्यक्ष सुधाकर कोहळे यांना विचारणा केली असता या मुद्यावर चर्चा झाल्याचे त्यांनी मान्य केले. मात्र शहा यांनी कुठलेही स्पष्ट संकेत दिले नसल्याचेदेखील त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान भाजपाचे सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी मात्र वरील वृत्ताला दुजोरा दिला. अमित शाह सायंकाळी ५ च्या सुमारास संघ मुख्यालयात दाखल झाले. यावेळी त्यांनी डॉ.भागवत तसेच सरकार्यवाह भैयाजी जोशी यांची भेट घेतली. तिघांमध्येही सुमारे दीड तास बंदद्वार चर्चा झाली. शहा अडीच तास मुख्यालयात होते व सायंकाळी ७.४० वाजता ते तेथून रवाना झाले.या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याबाबत संघ पदाधिकाऱ्यांनी मौन साधले. शाह यांनीदेखील बोलण्यास नकार दिला. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २०१९ च्या लोकसभा निवडणुकांसाठी भाजपाने तयारी सुरू केली आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी कमकुवत जनाधार असलेल्या प्रदेशावर जास्त लक्ष केंद्रित करावे. तसेच मित्रपक्षांशी प्रभावी समन्वयावर भर द्यावा, अशी सूचना संघातर्फे शहा यांना करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. राष्ट्रपतिपदाचा उमेदवार, काश्मीरमधील तापलेले वातावरण, कर्नाटकमधील पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुका या मुद्यांवरदेखील चर्चा झाली. विशेष म्हणजे संघाचा तृतीय वर्ष प्रशिक्षण वर्ग सुरू असताना शाह आल्यामुळे चर्चांना उधाण आले होते. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनीदेखील सकाळच्या सुमारास संघ मुख्यालयाला भेट दिली.सरसंघचालक, शाह एकाच विमानातअमित शाह दुपारी १२.१५ वाजता नागपुरात दाखल झाले. आश्चर्याची बाब म्हणजे सरसंघचालकदेखील त्याच विमानातून नागपुरात आले. मात्र बाहेर निघताना दोघेही एकत्र न येता वेगवेगळे बाहेर आले. सरसंघचालक संघ मुख्यालयाकडे रवाना झाले तर शाह यांच्या गाड्यांचा ताफा रविभवन शासकीय अतिथीगृहाकडे वळला.दोन दिवसांअगोदर का नाही आले ?शनिवारी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांचा षष्ट्यब्दीपूर्ती समारंभ होता. या सोहळ््याला अमित शाह यांचे पत्रिकेत नाव असूनदेखील ते आले नाही. त्यानंतर दोनच दिवसांनी ते नागपुरात आले. शनिवारी ते का आले नाही, याबाबत भाजपा कार्यकर्त्यांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू होती.
२०२४ मध्ये सर्व निवडणुका एकत्रच ?
By admin | Published: May 30, 2017 1:30 AM