रुपेश काळे खून प्रकरणात पाचही आरोपींना जन्मठेपच, उच्च न्यायालयाचा निर्णय
By राकेश पांडुरंग घानोडे | Published: May 29, 2023 03:36 PM2023-05-29T15:36:22+5:302023-05-29T15:42:55+5:30
आरोपींचे अपील फेटाळून लावले
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने जरीपटका येथील बहुचर्चित रुपेश ऊर्फ पप्पू काळे खून प्रकरणातील पाचही आरोपींची जन्मठेपेसह इतर शिक्षा कायम ठेवली आणि आरोपींचे या शिक्षेविरुद्धचे अपील फेटाळून लावले. प्रकरणावर न्यायमूर्तिद्वय विनय जोशी व वृषाली जोशी यांनी निर्णय दिला.
आरोपींमध्ये आकाश ऊर्फ बिट्टू जयकुमार सरोजकर (२५), कुणाल भारत गोस्वामी (२८), कामेश रवींद्र जांभुळकर (३८), शेखर प्रकाश आंबुलकर (३०) व संदेश ऊर्फ गोलू वेणू नाईक (३१) यांचा समावेश आहे. सरोजकर, गोस्वामी व आंबुलकर इंदिरानगर झोपडपट्टी, जांभुळकर कौशल्यानगर तर, नाईक हुडको कॉलनी येथील रहिवासी आहे. ७ जानेवारी २०१७ रोजी सत्र न्यायालयाने सातपैकी या पाच आरोपींना जन्मठेप व इतर विविध कालावधीच्या कारावासाची शिक्षा सुनावली. त्यावर आरोपींचा आक्षेप होता.
अशी घडली घटना
१४ जानेवारी २०१४ रोजी रात्री ८.३० च्या सुमारास आरोपींनी काळेला घेरले आणि त्याच्या डोळ्यांमध्ये मिरची पावडर फेकून चाकू व तलवारीने हल्ला केला. दरम्यान, काळेने आरोपींच्या तावडीतून कशीतरी सुटका करून पळ काढला. त्यानंतर आरोपींनी पाठलाग करून त्याला ठार मारले. काळेच्या शरीरावर २७ गंभीर जखमा आढळून आल्या होत्या.
काळेच्या आईचे अपीलही नामंजूर
सत्र न्यायालयाने राजेश ॲंथोनी हरीतस्वामी (३९, रा. संत मार्टीननगर) व शैलेश विजय मुखर्जी (३५, रा. कौशल्यानगर) या आरोपींना सबळ पुराव्यांअभावी निर्दोष सोडल्यामुळे काळेची आई ज्योती यांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने ते अपीलही नामंजूर करून सत्र न्यायालयाचा निर्णय योग्य असल्याचे सांगितले.