साईबाबासह पाचही आरोपी निर्दोष, खटल्यासाठी दिलेल्या मंजुऱ्या ठरवल्या अवैध; हायकोर्टाचा निर्णय
By राकेश पांडुरंग घानोडे | Published: March 6, 2024 06:47 AM2024-03-06T06:47:12+5:302024-03-06T06:48:57+5:30
राज्य सरकारने उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले. त्यावर बुधवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी दहशतवादी कारवाया प्रकरणातील आरोपी प्रा. गोकलकोंडा नागा साईबाबा ऊर्फ जी.एन. साईबाबा (वय ५३) याच्यासह इतर पाचही कथित नक्षलवाद्यांची निर्दोष सुटका केली. न्या. विनय जोशी व न्या. वाल्मीकी मेनेझेस यांनी हा निर्णय दिला.
इतर आरोपींमध्ये महेश तिरकी (२९), हेम मिश्रा (३८), प्रशांत सांगलीकर (६०), विजय तिरकी (३६) व पांडू नरोटे (२८) यांचा समावेश आहे. नरोटे याचे २५ ऑगस्ट २०२२ रोजी निधन झाले आहे. आरोपींविरुद्ध सत्र न्यायालयात चालविलेला खटलाच रद्दबातल ठरविण्यात आला.
स्थगितीची विनंती अमान्य
राज्य सरकारने उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले. त्यावर बुधवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी या निर्णयाला सहा आठवड्यांकरिता स्थगिती देण्याची मागणी केली. त्यानुसार सरकारच्या अर्जावर दुपारी ४:३० वाजता सुनावणी झाली, परंतु तो फेटाळून लावला.