नागपूर : स्वतंत्र विदर्भाच्या मागणीचे समर्थन करीत काँग्रेसचे माजी खासदार विलास मुत्तेमवार, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी आणि माजी मंत्री नितीन राऊत यांनी अखंड महाराष्ट्राची भाषा बोलणाऱ्या राज्यातील काँग्रेस नेत्यावर मंगळवारी तोफ डागली. बुधवारी वैदर्भीय काँग्रेस नेत्यांच्या भूमिकेचे समर्थन करीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री मामा किंमतकर यांनी विदर्भासाठी काँग्रेसने स्वतंत्र प्रदेश कमिटी स्थापन करावी अशी मागणी केली. इकडे भाजपचे राष्ट्रीय महासचिव मुरलीधर राव यांनी राज्यात भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरच स्वतंत्र विदर्भाचा निर्णय घेतला जाईल, अशी स्पष्ट भूमिका मांडली. किंमतकर आणि राव यांच्या पत्रपरिषद झाल्यानंतर दुपारी बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या संयोजिका माजी राज्यमंत्री अॅड. सुलेखा कुंभारे यांनी भाजपने विदर्भाबाबत योग्य भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली. विदर्भावर राजकारण रंगले असता शिवसेना यात मागे कशी राहणार ? शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सतीश हरडे यांनी सायंकाळी एक प्रसिद्धीपत्रक जारी करीत स्थानिक काँग्रेस नेत्यांना आताच कसा विदर्भ आठवला असा सवाल केला. वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावर राज्यातून विविध प्रतिक्रिया येत असताना ज्येष्ठ संघ विचारक मा.गो.वैद्य यांनी मात्र वेगळ्या विदर्भाच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. -तर वेगळी काँग्रेस कमिटी बनवा विदर्भासाठी काँग्रेसने स्वतंत्र प्रदेश कमिटी स्थापन करावी, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री व विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे तज्ज्ञ सदस्य मामा किंमतकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली. सिंचनासाठी संपूर्ण राज्याचा निधी जरी विदर्भाला दिला तरी पुढील २५ वर्षे अनुशेष भरून निघणार नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे स्वतंत्र विदर्भ राज्याशिवाय आता पर्याय नाही, असेही त्यांनी यावेळी जाहीर केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेसला विदर्भातून पुन्हा एकदा घरचा अहेर मिळाला आहे. किंमतकर म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी विदर्भासोबत केलेला करार कधीच पाळला नाही. सातत्याने अन्याय केला. विदर्भाचा निधी पळवित राहिल्याने विदर्भाचा अनुशेष सातत्याने वाढत राहिला आजही तो वाढलेलाच दिसून येईल. त्यामुळे महाराष्ट्रात राहून विदर्भाचा एकूण विकास करायचा म्हटला तर आणखी १०० वर्षे अनुशेषच भरून निघणार नाही, अशी भयावह परिस्थिती आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचे जे नेते आज अखंड महाराष्ट्राची भाषा करीत आहेत त्यांच्यामुळेच विदर्भाचा अनुशेष वाढला आहे, भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले तरच.. महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीचे सरकार असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखंड महाराष्ट्राबाबत मांडलेली भूमिका योग्यच आहे. पक्षाचीही तीच भूमिका आहे. विदर्भातील जनतेमुळे स्वतंत्र विदर्भ मिळणार नाही. राज्यात भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरच स्वतंत्र विदर्भाचा निर्णय घेतला जाईल, अशी स्पष्ट भूमिका भाजपचे राष्ट्रीय महासचिव मुरलीधर राव यांनी बुधवारी पत्रकार भवन येथे आयोजित वार्तालाप कार्यक्रमात मांडली. गेल्या विधानसभा निवडणुक ीत भाजपला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने राज्यात युतीचे सरकार आले. केंद्रातील पक्ष नेतृत्व सक्षम आहे. दलित घटक हा समाजाचा अविभाज्य घटक आहे. त्यांच्या विकासासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. गोरक्षा हा काही ठिकाणी संघर्षाचा मुद्दा ठरत आहे. या संदर्भात भाजप व स्वदेशी जागरण मंच यांच्यात भिन्न मतप्रवाह आहेत. मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ वक्तव्य अर्धवट विदर्भाच्या मुद्यावर सध्या विधिमंडळात वादळ उठले आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे वक्तव्य केले, ते अर्धवट आहे असे आम्हाला वाटते. त्यामुळे विदर्भाबाबत भाजपने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या संयोजिका माजी राज्यमंत्री अॅड. सुलेखा कुंभारे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली. अॅड. कुंभारे म्हणाल्या, ‘मुख्यमंत्री फडणवीस यांनी मी अखंड महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे’, असे स्पष्ट केले आहे. ‘मी अखंड महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे परंतु मी विदर्भाचा समर्थकसुद्धा आहे’, असे स्पष्ट करायला हवे होते. त्यांनी केवळ मी अखंड महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे, इतकेच सांगितले. आंदोलन होऊ न देता वेगळा विदर्भ द्यावा वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावर राज्यातून विविध प्रतिक्रिया येत असताना ज्येष्ठ संघ विचारक मा.गो.वैद्य यांनी वेगळ्या विदर्भाच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. वेगळ्या विदर्भाचा मुद्दा हा जनतेच्या भावनांशी निगडित असून भाजपाने यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. विशेष म्हणजे कुठलेही आंदोलन न होऊ देता वेगळे विदर्भ राज्य कसे निर्माण होईल, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे मत त्यांनी व्यक्त केले.नागपुरात प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना त्यांनी आपल्या भावना मांडल्या. स्वतंत्र विदर्भाची मागणी जुनी आहे. लहान राज्यांमुळे प्रगती होते. त्यामुळे स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावर भाजपाने राज्य पुनर्रचना आयोग नेमावा व वेगळे राज्य निर्माण करावे, असे त्यांनी प्रतिपादन केले. देशात दलितांवर होत असलेल्या अत्याचारांवरदेखील त्यांनी चिंता व्यक्त केली.
सारे काही स्वतंत्र विदर्भासाठी
By admin | Published: August 04, 2016 2:03 AM