लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्यावतीने घेण्यात येणारे ९९ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन नागपूरलाच होणार, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळे यांनी गुरुवारी ही घोषणा केली. संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ नाट्यकर्मी प्रेमानंद गज्वी यांच्या नावाची आधीच घोषणा करण्यात आली आहे. गज्वी यांच्या अध्यक्षतेत येत्या २२ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी २०१९ यादरम्यान हे नाट्य संमेलन येथे होणार असल्याची माहिती परिषदेचे उपाध्यक्ष नरेश गडेकर यांनी दिली. या निर्णयामुळे गेल्या ३३ वर्षांपासून सुरू असलेला वनवास संपला असून उपराजधानीसह विदर्भालाही एका मोठ्या आयोजनाचा सन्मान प्राप्त झाला आहे.गेल्या काही वर्षात संत्रानगरीने आपली स्वतंत्र सांस्कृतिक ओळख निर्माण केली आहे. ही ओळख व्यापक स्वरूपात स्वीकारली जात असून नाट्य संमेलन हे त्याचेच फलित आहे. यापूर्वी १९८५ साली नागपूरला मराठी नाट्य संमेलन भरविण्यात आले होते व प्रभाकर पणशीकर या संमेलनाचे अध्यक्ष होते. मात्र अंतर्गत वादविवाद व अनेक कारणांमुळे प्रयत्न होऊनही संमेलन नागपूरला होऊ शकले नाही. यावेळी मात्र मराठी नाट्य परिषदेच्या नागपूर शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी संपूर्ण ताकद पणाला लावून यजमानपद उपराजधानीकडे खेचून आणले. यावेळी मध्यवर्ती शाखेकडे नागपूरसह कोल्हापूर, पिंपरी-चिंचवड, महाबळेश्वर, सोलापूर, नाशिक व लातूर येथील संस्थांनी प्रस्ताव पाठविले होते. नरेश गडेकर हे परिषदेच्या उपाध्यक्षपदावर असल्याने नागपूरला हा मान मिळेल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. लोकमतशी बोलताना नरेश गडेकर यांनी सांगितले, संमेलन अध्यक्षाप्रमाणे यजमान पदासाठीही निवडणूक होऊ नये अशी आमची प्रामाणिक इच्छा होती. त्यामुळे संमेलन स्थळ सर्वसंमतीने ठरवावे यासाठी आम्ही सर्व संस्थांशी चर्चा केली. नागपूर उपराजधानीचे शहर असूनही ३३ वर्षे नाट्य संमेलनाच्या यजमान पदापासून वंचित राहावे लागले होते. मुख्यमंत्री नागपूरचे असून नितीन गडकरी हेही केंद्र शासनाच्या मंत्रिमंडळात महत्त्वाचे नेते आहेत. शिवाय आज परिस्थिती बदलली असून संमेलनाच्या आयोजनासाठी नागपूर हे सर्वच दृष्टीने उपयुक्त शहर असल्याचे इतर संस्थांना समजाविण्यात आम्हाला यश आले. या संस्थांनीही हे मान्य करीत प्रस्ताव मागे घेतले. नाट्य परिषदेच्या नियामक मंडळानेही सर्वेक्षण करून नागपूर महानगर शाखेच्या प्रस्तावाला प्राधान्य दिल्याचे गडेकर यांनी स्पष्ट केले.