नागपूर : नागपूर आकाशवाणीचे ‘अ’ श्रेणी कलाकार व प्रसिद्ध सतारवादक नासिर खान यांचे बुधवारी कोरोनामुळे निधन झाले. निधनसमयी ते ५२ वर्षांचे होते. पाच वर्षाचे असतानाच नासिर खान यांनी सैनी घराण्याचे पं. अरुणकुमार भट्टाचार्य यांच्याकडून सतार शिकण्यास सुरुवात केली. सोबतच वडील प्रसिद्ध सारंगी वादक उस्ताद हमीद खान यांच्याकडूनही त्यांना मार्गदर्शन होत होते. ग्वाल्हेरचे सारंगी वादक उस्ताद सरदार खान आणि पुणे येथील सारंगी वादक उस्ताद लतीफ अहमद खान यांच्याकडूनही नासिर खान यांनी संगीताचे धडे गिरवले. १९८८पासून नासिर खान नागपूर आकाशवाणीत कार्यरत आहेत. त्यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर सादरीकरण केले असून, आपल्या सतारवादनाच्या मधूर स्वरांनी रसिकांना घायाळ केले आहे. गेले काही दिवस त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
आकाशवाणीचे ‘अ’ श्रेणी सतारवादक नासिर खान यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 4:07 AM