नागपूर : योगमूर्ती जनार्दनस्वामी महाराज यांच्या शतकोत्तर रजत जयंतीनिमित्त जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळातर्फे अखिल भारतीय योगसंमेलनाचे आयोजन 17 ते 19 नोव्हेंबर या कालावधीत करण्यात आले आहे. या संमेलनात आतापर्यंत 2500 योगसाधकांची नोंदणी झाली असून 5 हजारापेक्षा जास्त योगसाधक सहभागी होण्याची शक्यता आहे, अशी माहिती जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळाचे कार्यवाह व योगतज्ज्ञ राम खांडवे यांनी येथे दिली.
रामनगर संघ मैदान येथे आयोजित या योगसंमेलनाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. या प्रसंगी जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळाचे अध्यक्ष सुनील सिर्सिकर उपस्थित होते. राम खांडवे म्हणाले, योगमूर्ती जनार्दनस्वामी महाराज यांच्या शतकोत्तर जयंतीनिमित्त 1992 मध्ये योग संमेलन आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी 1500 हून अधिक योगसाधक सहभागी झाले होते. तेव्हापासून नागपुरात योग चळवळीला सुरुवात झाली.
आजही 500 योग शिक्षक नि:शुल्क प्रशिक्षण देत आहे. म्हणूनच, इतर ठिकाणी योगाचे वर्ग चालतात नागपुरात मात्र योग चळवळ चालते. संमेलन होणा-या रामनगर मैदानाला ‘योगमूर्ती नगर’ असे नाव देण्यात आले आहे. योगसाधक एकाचवेळी योगसाधना करू शकतील या प्रकारे मंडपाची उभारणी करण्यात आली आहे. याचे व्यासपीठ 80 बाय 40 फुटाचे असणार आहे. योगसंमेलनाचे उद्घाटन शुक्रवारी 17 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होईल. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहतील.
या योगसंमेलनात विविध रोगांच्या प्रसिद्ध डॉक्टरांची चमू रोगांची शास्त्रीय कारणे सांगतील तर यावर उपयुक्त योगोपचार सांगितले जातील. या शिवाय, प्रसिद्ध प्रवचनकार अशित आंबेकर, न्यूरो सायकियाट्रीस्ट डॉ. संजय फडके यांचे मार्गदर्शन होईल. रोज सायंकाळी 6 ते 8 वाजताच्या दरम्यान प्रसिद्ध कीर्तनकार चारुदत्त आफळे यांचे कीर्तन, विवेक घळसासी व जितेंद्रनाथ महाराज यांची प्रवचने आयोजित केली आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.