योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: भाजपकडून नागपूर शहरातील सर्व जागांवर उमेदवार उतरविण्याची तयारी सुरू झाली असताना पुर्व नागपुरात मात्र पक्षाची डोकेदुखी वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या व राज्य महिला आयोगाच्या सदस्य आभा पांडे यांनी या मतदारसंघातून उमेदवारीचा बिगुल वाजवला आहे. मला राष्ट्रवादीने तिकीट नाही दिले तरी यावेळेस मी निवडणूक लढणारच अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे महायुतीतच उमेदवारीवरून धुसमूस सुरू असल्याचे चित्र स्पष्ट झाले असून ‘ऑल इज नॉट वेल’ अशीच स्थिती असल्याचे दिसून येत आहे.
मागील तीन विधानसभा निवडणूकीपासून कृष्णा खोपडे हे पुर्व नागपुरातून विजयी झालेले आहेत. यावेळी विजयी चौकार लावण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. लोकसभा निवडणूकीतदेखील पुर्व नागपुरातूनच भाजपला सर्वाधिक मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे त्यांची तिकीटाची दावेदारी मजबूत असल्याचे बोलले जात आहे. जो उमेदवार जिंकू शकेल त्यालाच उमेदवारी मिळेल अशी भूमिका नागपुरात महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत मांडण्यात आली होती. मात्र नागपुरातूनच या भूमिकेला सुरूंग लागताना दिसतो आहे. आभा पांडे यांनी काहीही झाले तरी पूर्व नागपुरातून निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे.
राष्ट्रवादीने तिकीट नाही दिले तर जनतेसाठी मी अपक्ष म्हणून निवडणूक लढेन अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. आभा पांडे यांना २०१७ साली झालेल्या मनपा निवडणूकीत जवळपास ११ हजार मते मिळाली होती. शिवाय त्यांच्या प्रभागातील अनेक बुथ पुर्व नागपुरात येतात. त्यामुळे त्या सक्रियपणे विरोधात उतरल्या तर निश्चितच भाजपच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
सक्रिय प्रचाराला सुरुवात
नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघातून मी कृष्णा खोपडे यांच्या विरोधात निवडणूक लढवावी ही इथल्या स्थानिक जनतेची मागणी आहे. मी माझ्या प्रचाराला सुरुवात केली आहे, असे आभा पांडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
महायुतीच्या फॉर्म्युल्यानुसारच उमेदवार : कुकडे
यासंदर्भात भाजपचे शहराध्यक्ष बंटी कुकडे यांना संपर्क केला असता महायुतीचे वरिष्ठ नेते जो फॉर्म्युला ठरवतील त्यानुसारच उमेदवार निश्चित केला जाईल असे सांगितले. पुर्व नागपूर हा भाजपचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे येथून भाजपचाच उमेदवार असणार यात काहीच शंका असण्याचे कारण नाही. आभा पांडे यांच्याशी त्यांचे पक्षनेते बोलतील असा आम्हाला विश्वास आहे, असे कुकडे यांनी स्पष्ट केले.