नागपूर : अभिनेता, लेखक गिरीश कर्नाड हे डाव्या विचारांचे हाेते आणि सर्व डावे स्वत:ला उदारमतवादीच समजतात, अशी टीका प्रसिद्ध कानडी लेखक डाॅ. एस. एल. भैरप्पा यांनी केली. विदर्भ साहित्य संघाच्या शतक महाेत्सवानिमित्त आयाेजित विशेष संवाद कार्यक्रमात कर्नाड यांच्या टिपू सुलतानवरील वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना ते बाेलत हाेते.
गिरीश कर्नाड यांची अभिनय, कला क्षेत्रावर चांगली पकड हाेती; पण विचारधारेने डावे हाेते, हे अमान्य करता येत नाही. माझा मात्र डावे किंवा उजवे अशा दाेन्ही बाजुंवर विश्वास नाही. मी रामायणातील सीता अग्निपरीक्षेच्या प्रसंगावर टीका केली तेव्हा कट्टरवाद्यांनी माझ्यावर टीकेची झाेड उठविली हाेती. या अर्थाने तुम्ही मला मानवतावादी म्हणून शकता, अशी भावना डाॅ. भैरप्पा यांनी व्यक्त केली. टिपू सुलतानने भारताला नुकसान पाेहचविण्यासाठी क्रूर प्रयत्न केले हाेते, हे विसरता येणार नाही व कर्नाड यांनी हा इतिहास जाणला नव्हता, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. वि.सा. संघाच्या संवाद कार्यक्रमात लेखिका व अनुवादिका उमा कुळकर्णी यांनी डाॅ. भैरप्पा यांनी मुलाखत घेतली. संचालन वृषाली देशपांडे यांनी केले तर वि.सा. संघाचे कार्याध्यक्ष रवींद्र शाेभणे यांनी प्रास्ताविक केले.
कादंबरी लेखनासाठी कल्पनाशक्ती प्रबळ कवी
डाॅ. भैरप्पा यांनी बालपण ते कादंबरीकार असा प्रवास यावेळी उलगडला. अतिशय गरीब कुटुंबात जन्मलेल्या भैरप्पा यांनी वडील व मामाकडून मिळालेले वाईट अनुभव सांगितले. प्लेगने माेठी बहीण व भावाचा मृत्युनंतर वर्षभरात आईचाही प्लेगने मृत्यू झाला. त्याचा मनावर खाेल परिणाम झाला. त्यामुळे मृत्यू का येताे, त्याचा अर्थ काय, हे जाणून घेण्यासाठी ‘तत्त्वज्ञान’ विषयाचा अभ्यास केला. एम.ए. पर्यंतचे शिक्षण घेण्यासाठी भिक्षा मागण्यापासून केलेल्या अनेक कष्टाचा उलगडा केला. माझ्यासाठी तत्त्वज्ञानाच्या पुस्तकात जगण्याचा खरा अर्थ शिकविणारे साहित्य ठरले. रामायण, महाभारत, उपनिषदांमध्ये हे तत्त्वज्ञान मिळते. पुस्तक वाचणे हा माझा प्राण आहे. उपाशी असताना मिळालेले काम साेडून पुस्तक वाचण्याला प्राधान्य देण्याचा अनुभव सांगताना, उद्या मेलाे तरी पुस्तक वाचण्याचे समाधान मला राहिल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. तत्त्वज्ञानाचा अभ्यास करताना कादंबरी लेखनाकडे वळण्याचा प्रवासही त्यांनी मांडला. अनेक देशी-परदेशी कादंबऱ्या वाचल्या. तुमची कल्पनाशक्ती प्रबळ असल्याशिवाय कादंबरी, साहित्य किंवा कलेची निर्मिती हाेऊच शकत नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. साहित्य वाचताना वाचकांच्या मनात चित्र उभे राहिले पाहिजे. कालिदासांच्या साहित्याप्रमाणे ते खरे नसले तरी खरे वाटले पाहिजे.
नागपूरकरांनी ती ठिकाणे शाेधावी
डाॅ. भैरप्पा यांच्या ‘मनरा’ कादंबरीत नागपूरमधील एका प्रसंगाचे वर्णन आहे. त्यातील काॅलेज, हाॅटेल ही ठिकाणे नागपूरकरांनीच शाेधावी, असे मिश्किलपणे सांगत, हे सर्व वर्णन काल्पनिक असल्याचे रहस्य त्यांनी सांगितले. कादंबरी लेखनानंतर कितीतरी वर्षांनी पहिल्यांदा नागपूरला आल्याचा उल्लेखही त्यांनी केला.