भाजप महोत्सवात, काँग्रेस मात्र कोमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2021 12:32 PM2021-12-19T12:32:06+5:302021-12-19T12:39:04+5:30
विधान परिषदेची निवडणूक जिंकताच भाजप महापालिकेसाठी इलेक्शन मोडमध्ये गेली आहे. दुसरीकडे, विधान परिषदेच्या निकालानंतर काँग्रेस कोमात गेल्याचे चित्र आहे.
नागपूर : महापालिकेची निवडणूक तोंडावर आहे. गेल्या १५ वर्षांपासून सत्तेत असलेली भाजप यावेळी पुन्हा चौकार मारण्यासाठी सज्ज झाली आहे. खासदार सांस्कृतिक महोत्सव, खासदार क्रीडा महोत्सव यासह प्रभागांमध्ये लहान-मोठे सांस्कृतिक कार्यक्रम सुरू झाले असून, वातावरण निर्मिती केली जात आहे. दुसरीकडे मात्र, विधान परिषदेच्या निकालानंतर काँग्रेस कोमात गेल्याचे चित्र आहे.
विधान परिषदेची निवडणूक जिंकताच भाजप महापालिकेसाठी इलेक्शन मोडमध्ये गेली आहे. प्रभागात संपर्क वाढवा, सांस्कृतिक कार्यक्रमांसह विविध शिबिर घेऊन लोकांपर्यंत पोहोचण्याच्या सूचना भाजपचे नगरसेवक व इच्छुकांना देण्यात आल्या आहेत. खासदार सांस्कृतिक महोत्सव, खासदार क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून प्रभागातील भाजप कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. या दोन्ही महोत्सवाच्या माध्यमातून वातावरण निर्मिती केली जात आहे. मिस कॉल देऊन नागरिकांना पास मिळत आहे. प्रभागातील प्रमुख कार्यकर्तेही नागरिकांना पास देऊन सहानुभूती मिळवीत आहेत.
दुसरीकडे काँग्रेस मात्र लहान मोठ्या आंदोलनात व्यस्त आहे. निवडणूक तोंडावर असल्यामुळे पालकमंत्री नितीन राऊत, शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे यांनी पुढाकार घेत शहरव्यापी मोठे आंदोलन किंवा मोठा मेळावा घेऊन कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे निर्देश देण्याची गरज आहे. मात्र, तसे नियोजन होताना दिसत नाही. भाजपच्या कार्यक्रमांची चर्चा शहरात रंगताना पाहून काँग्रेस कार्यकर्ते निराश होत आहेत.