नागपूर : विदर्भाच्या दौऱ्यावर असलेल्या मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी नागपुरातील मनसेची सर्व पदे बरखास्त करीत असल्याची घोषणा केली. पक्षात बऱ्याच काही चुकीच्या गोष्टी सुरू होत्या. त्यामुळे गेल्या १६ वर्षांत नागपुरात पक्ष पाहिजे तसा वाढला नाही, अशी कारणमीमांसा करीत आपल्याकडूनही नागपूरकडे दुर्लक्ष झाल्याची कबुलीही त्यांनी दिली.
राज ठाकरे म्हणाले, घटस्थापनेनंतर २७ सप्टेंबरला मुंबईत पदाधिकाऱ्यांची बैठक होईल. त्यानंतर २८ सप्टेंबरला मनसे पदाधिकाऱ्यांची टीम नागपुरात येईल व संघटनात्मक बांधणी करेल. ही बांधणी करताना चांगले काम करणारे काही जुनी मंडळी व त्यांच्या जोडीला काम करण्यास उत्सुक असलेल नवे तरुण यांना पक्षात स्थान दिले जाईल. एवढेच नव्हे तर नवरात्रीनंतर कोल्हापूरमार्गे कोकण दौरा आटोपल्यावर आपण पुन्हा तीन दिवस नागपूर दौरा करू व पक्ष बांधणीवर स्वत: लक्ष देऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी नागपुरात मनसेचे नगरसेवक वाढलेले दिसतील, असा दावाही त्यांनी केला.