नागपूर- शहरातील सर्व महत्वाची पदे मी आज बरखास्त करत आहे आणि येणाऱ्या २६-२७ तारखेला घटस्थापना होईल त्यावेळी मी नवीन कार्यकारणी जाहीर करेन. यात जुनेही काही लोक असतील. आमचे अविनाश जाधव, संदीप देशपांजे, प्रकाश महाजन, अनिल शिदोरे येथे येतील आणि शहराची आणि इतर सर्वच विंगची बांधनी करतील. साधारणपणे नौरात्र झाल्यानंतर मी कोल्हापूर झाल्यानंतर कोकणाचा दौरा करणार आहे. यानंतर मी पुन्हा दोन तीन दिवसांसाठी नागपुरात येणार आहे आणि इथल्या बांधनीकडे लक्ष देणार आहे, असे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी म्हटले आहे. राज ठाकरे सध्या नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
नागपूर शहरातील कार्यकारिणी का बरखास्त केली, यावर बोलताना राज म्हणाले, "काही चुकीच्या गोष्टी सुरू होत्या. सोळा वर्ष पक्षाला झाली आहे. त्यामुळे मला येथे ज्या पद्धतीचा पक्ष दिसायला हवा होता तसा दिसत नाहीये. अनेक होतकरू तरून सध्या नागपुरात विदर्भात आहेत. त्यांना योग्य संधी देणे. त्यांना वर आणणे आणि त्यांच्यासोबत योग्य पद्धतीने काम करणे योग्य असते."
नागपुरात प्रस्थापितांविरोधात लढा द्यावा लागेल, या कालच्या बैठकीतील विधानावर बोलताना राज म्हणाले, प्रत्येकजण जेव्हा मोठा होतो तेव्हा तो प्रस्थापितांविरोधात लढा देऊनच मोठा होतो. विदर्भ हा पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्लाह म्हणून ओळखला जायचा. आता आता तो भाजपचा आहे. इथे जर भाजप प्रस्तापित असेल, तर त्यांच्या विरोधातच लढावे लागेल. मात्र, याचवेळी राजकारण हे वेगळे असते आणि वैयक्तीक संबंध हे वेगळे असतात, असेही ते म्हणाले.