लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एखाद्या व्यक्तीमध्ये एवढी गुणवैशिष्ट्ये असतात, की देवाने त्यांना वेगळी बुद्धिमत्ता दिली की काय, असेच वाटते. मैत्रेयी मोहन घनोटे ही यातीलच एक आहे. १६ वर्षाच्या मैत्रेयीने आजपर्यंत ४५० हून अधिक पुरस्कार प्राप्त केले आहे. संगीत, नृत्य, वक्तृत्व, कला, नाट्य, अभिनय या क्षेत्रात अफलातून कामगिरी करणाऱ्या मैत्रेयीने शिक्षण क्षेत्रातही मोठी भरारी घेतली आहे. दहावीच्या परीक्षेत मैत्रेयीला ९९.२० टक्के गुण मिळाले आहे. मैत्रेयीच्या एकंदरीत व्यक्तिमत्त्वाला ‘सर्वगुणसंपन्न’ हेच विशेषण साजेसं आहे.क्रीडा, संगीत, अभिनय या क्षेत्रातील दिग्गजांचा बायोडाटा बघतो तेव्हा, शिक्षणामध्ये या दिग्गजांची कामगिरी सुमार असते. पण मैत्रेयीचे असे नाही. ती प्रत्येक क्षेत्रात प्रतिभासंपन्न आहे. वयाच्या सातव्या वर्षी राष्ट्रपती भवनात ‘माय कंट्री’ या विषयावर धडाधड भाषण तिने ठोकले. चेहऱ्यावर सदैव हास्य ठेवणारी मैत्रेयी जेव्हा शिवाजी महाराज, झाशीची राणी, लोकमान्य टिळकांवर कीर्तन करते, तेव्हा तिचा भारदस्त आवाज सर्वांना प्रभावित करतो. शहरात होणाऱ्या कथाकथन, वक्तृत्वाची एखादीच स्पर्धा तिने सोडली असेल. प्रत्येक स्पर्धेत मैत्रेयीचे पारितोषिक पक्केच असते. तिने लिहिलेल्या ‘मेरा आदर्श गाव’ या नाटकाला राष्ट्रीय स्तरावर दुसरे पारितोषिक मिळाले आहे. ती शिवाजी महाराज, झांशीची राणी यावर वयाच्या दहाव्या वर्षापासून जाहीर कीर्तन करीत आहे. या मुलीला चित्रकलेतही एवढी आवड आहे, की राज्यस्तरावर तिने पारितोषिक पटकाविले आहे. तिचे शास्त्रीय नृत्यातील पदलालित्य जसे परिपूर्ण आहे तेवढीच उत्तम कॅसिनोही ती वाजविते. राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार, राष्ट्रीय बाल पुरस्कार, सावित्रीबाई फुले फेलोशिप, महाराष्ट्र भूषण, राष्ट्रीय व राज्यस्तरीय कलाभूषण, विदर्भरत्न व अनेक बाल गौरव पुरस्काराने मैत्रेयीला गौरविण्यात आले आहे.एवढे सर्व गुणवैशिष्ट्य असताना मैत्रेयीने शाळेत कधी पहिला नंबर सोडला नाही. दहावीतही ९९.२० टक्के गुण तिने संपादन केले. खूप अभ्यास नाही, पण तिच्या अभ्यासात सातत्य होते. टीव्हीवरची मालिका तिने कधी सोडली नाही. विशेष म्हणजे दहावीच्या वर्षात डेंग्यूमुळे ती महिनाभर आजारी होती. पण असामान्य बुद्धिमत्तेच्या मैत्रेयीवर काहीच परिणाम झाला नाही. मैत्रेयी म्हणते तिच्या अंगीभूत कलागुणांचा अभ्यासातही फायदा होतो.तिच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा अभिमानमैत्रेयीचे लहानपणापासून अष्टपैलू व्यक्तिमत्त्व राहिले आहे. ती खूप धीट आहे. सात वर्षाची असताना तिने राष्ट्रपतीला प्रश्न विचारला आहे. मैत्रेयीने प्रत्येक स्पर्धेत पारितोषिक मिळविले आहे. तिच्या एकंदरीत कामगिरीवरून ९९ टक्के गुण मिळतील असा आम्हाला विश्वास होता. तिच्यातील या सर्व गुणवैशिष्ट्यांमुळे आम्हाला तिचा अभिमान आहे.मृण्मयी घनोटे, आई