नागपूर : शहरात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा, याकरिता सर्व मूर्तीकार कलावंतानी महापालिकेच्या झोन कार्यालयाकडे नोंदणी करून परवाना घेणे आवश्यक असल्याची माहिती मनपाचे उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक डॉ. गजेंद्र महल्ले यांनी दिली.
उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाच्या आदेशान्वये केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाने मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहे. १९ सप्टेंबरला गणरायांचे आगमन होणार आहे. यावर्षी गणेशोत्सव पर्यावरणपूरक साज्रा करण्याच्या दृष्टिने शहरातील सर्व नागरिक, भाविक, मूर्तीकार तसेच कलावंताना काही निर्देशाचे पालन करणे आवश्यक आहे. नागरिकांनी शहरातील जलाशयाचे प्रदुषण रोखण्यासाठी पीओपी मुर्तींची स्थापना करू नये, पर्यावरण पूरक साहित्याने निर्माण केलेल्या मातीच्या मूर्तीची स्थापना करावी.पर्यावरण पूरक रंगाचा वापर करावा. मूर्तीकारांनी घातक व अविघटनशील रासायनिक रंगाचा वापर करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मूर्तीसाठी कमाल उंचीचे कोणतेही निर्बंध असणार नाही. मात्र गणेश विसर्जन कृत्रिम तलावातच करावयाचे असल्याने ज्या सार्वजनिक मंडळाचे गणेश मूर्ती ४ फुटापेक्षा अधिक उंच असतील त्यांना विसर्जनाची व्यवस्था महानगरपालिका हद्दी बाहेर करावी लागणार आहे. तसेच संबंधीत पोलिस विभागाला कळवुन रितसर मिरवणुकीची परवानगी घ्यावी लागेल. घरघुती गणेश मुर्तीसाठी या अगोदर २ फुट उंचीची कमाल मर्यादा करण्यात आली होती. यावर्षी घरघुती गणेश मुर्तीसाठी उंचीची कोणतीही मर्यादा असणार नाही. परंतु, घरघुती मूर्तीच्या उंचीवर स्वखुशीने २ फुट उंचीची मर्यादा पाळावी. असे आवाहन गजेंद्र महल्ले यांनी केले आहे.
तलावात विसर्जनाला बंदी
मनपा क्षेत्रातील तलावत विसर्जन करण्याला बंदी घालण्यात आली आहे. नागरिकांनी मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावातच करावे, मूर्तीच्या सजावटीसाठी प्लास्टिक व थर्माकोलचा वापर करु नये, अवैध विनापरवाना मूर्तीची निर्मिती, साठवणूक, वापर व विक्री करीत असल्यास तसेच मार्गदर्शक तत्वाचे उल्लंघन केल्यास १० हजार रुपये दंड आकारला जाणार असल्याचे महल्ले यांनी सांगितले.