लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विचार, विवेक आणि वैराग्य या वारीवरची वाट समाज चुकला आहे आणि म्हणूनच या देशाला पुन्हा एकदा महात्म्याची नितांत गरज आहे. मात्र, गांधी कसे चुकले... हे सांगण्यातच सारे विचारक गुंतले असल्याचे प्रतिपादन माजी आमदार उल्हास पवार यांनी आज येथे केले.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या नागपूर विभागीय केंद्र आणि आकांक्षा प्रकाशनच्या वतीने आयोजित लोकमतच्या नागपूर आवृत्तीचे संपादक सुरेश द्वादशीवार यांच्या ‘देशाला काय हवे’ या पुस्तकाचे प्रकाशन उल्हास पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानच्या विभागीय केंद्राचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी होते. तर व्यासपीठावर सुरेश द्वादशीवार यांच्यासह अरुणा सबाने, ज्येष्ठ संपादक देवेंद्र गावंडे व श्रीपाद अपराजित, नगरसेवक प्रफुल्ल गुडधे, डॉ. सागर खादीवाला, रमेश बोरकुटे उपस्थित होते.आणीबाणीचा विरोध करण्यासाठी विविध राजकीय पक्षांची निर्मिती झाली. तेव्हापासून संघविचारांची माणसे मोक्याच्या ठिकाणी बसली आणि देशात अस्वस्थ राजकारणाला सुरुवात झाल्याचे पवार म्हणाले. काँग्रेसला ब्रिटिशांपासून ते आप्तांपर्यंत सगळ्यांसोबतच संघर्ष करावा लागलेला आहे. मात्र, संघाला कधीच संघर्ष करावा लागलेला नाही. अशास्थितीत द्वादशीवारांचे हे पुस्तक महत्त्वाचे ठरते. हे संपूर्ण दशकच खूप अस्वस्थ करणारे असून, त्या अस्वस्थतेचा सामना करण्यासाठी या पुस्तकातील प्रखर शब्द महत्त्वाचे असल्याचे उल्हास पवार यावेळी म्हणाले.तर, पुस्तक प्रकाशनाला उत्तर देताना सुरेश द्वादशीवार यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. राजकीय तेढ हा राष्ट्रीय तेढीचा मुद्दा कसा असू शकतो, असा सवाल उपस्थित करताना त्यांनी राजकारणापेक्षा राष्ट्रकारण नेहमीच मोठे असल्याचे स्पष्ट केले. इंग्रजांनी राज्य एकसंध केले आणि स्वातंत्र्य युद्धाने लोक एकत्र झाले. हा एकोपा टिकविणे गरजेचे आहे. आपल्या देशात संस्कृतीकरण म्हणजे ब्राह्मणीकरण आणि संघीकरणाच्या जवळ असल्याची टीका करत त्यांनी संस्कृतीकरणामुळे देश तुटू नये तर सामाजिककरणामुळे हा देश मोठा व्हावा, असे आवाहन द्वादशीवार यांनी यावेळी केले. संचालन डॉ. रेखा दंडिगे-घिया यांनी केले, तर आभार अनिल इंदाणे यांनी मानले.
सारे विचारक गांधी कसे चुकले, हेच सांगण्यात गुंतलेले: उल्हास पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 11:17 PM
गांधी कसे चुकले... हे सांगण्यातच सारे विचारक गुंतले असल्याचे प्रतिपादन माजी आमदार उल्हास पवार यांनी आज येथे केले.
ठळक मुद्देसुरेश द्वादशीवार यांच्या ‘देशाला काय हवे’ पुस्तकाचे प्रकाशन