लाेकमत न्यूज नेटवर्क
काटाेल : सहकारी जिनिंगचे संचालक असल्याचे कारण पुढे करून जिल्हा उपनिबंधक गाैतम वालदे यांनी सेवा सहकारी गटातील तिघांचे उमेदवारी अर्ज रद्द केले हाेते. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जिल्हा उपनिबंधक यांचा निर्णय अवैध ठरवीत तिन्ही उमेदवारांना सेवा सहकारी गटातून निवडणूक लढण्यास परवानगी दिल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.
चरणसिंग ठाकूर, नितीन डेहनकर व विनायक मानकर हे तिघेही काटाेल शहरातील सहकारी जिनिंग प्रेसिंग संस्थेचे संचालक असून, त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सेवा सहकारी गटातून उमेदवारी अर्ज दाखल केले हाेते. त्यांच्या अर्जावर बाजार समितीचे संचालक अजय लाडसे यांनी आक्षेप घेतला हाेता. निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहायक निबंधक (सहकारी संस्था) अविनाश इंगळे यांनी उमेदवारी अर्जाच्या छाननीदरम्यान हा आक्षेप फेटाळला हाेता. त्यामुळे अजय लाडसे यांनी जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) गाैतम वालदे यांच्याकडे तक्रार केली हाेती.
जिल्हा उपनिबंधक गाैतम वालदे यांनी मात्र तिघांनाही सेवा सहकारी गटातून निवडणूक लढण्यास अपात्र असल्याचे सांगत त्यांचे उमेदवारी अर्ज रद्द ठरविले हाेते. त्यामुळे त्यांनी या निर्णयाच्या विराेधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाद मागितली हाेती. उच्च न्यायालयाने यासंदर्भात शनिवारी (दि. १८) निवाडा देत जिल्हा उपनिबंधक गाैतम वालदे यांचा निर्णय अवैध असल्याचा निवाडा दिला. त्यामुळे चरणसिंग ठाकूर, नितीन डेहनकर व विनायक मानकर यांची सेवा सहकारी गटातील उमेदवारी कायम राहिली आहे.