लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीत कोरोनाचा उद्रेक झाला असून, राज्य शासनाच्या दुर्लक्षामुळेच ही स्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात भीषण स्थिती असताना तिघांपैकी एकही मंत्री नागपुरात नाही. कुणी पक्षाच्या प्रचारात व्यस्त आहे तर कुणी बैठका घेत आहे. राज्यातील इतर सर्व मंत्री त्यांच्या जिल्ह्यांकडे लक्ष देत असताना नागपुरातील मंत्र्यांचे मात्र स्वत:च्या जिल्ह्याकडे लक्ष नाही, असा आरोप भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी लावला आहे. शुक्रवारी पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.
नागपुरात कोरोनामुळे हाहाकार माजलेला असताना नागपूरचे पालकमंत्री तामिळनाडूत पक्षाचा प्रचार करण्यात व्यस्त आहेत, तर गृहमंत्री स्वत:ची खुर्ची वाचवत आहेत. मेडिकल, मेयोसह सरकारी रुग्णालयातील व्यवस्था ढासळल्या आहेत. अगोदरच्या लाटेचा अनुभव असतानादेखील वेळेत उपाययोजना झाल्या नाही. आता स्थिती खराब झाल्यावर नियोजनाचा देखावा करण्यात येत आहे, असा आरोप त्यांनी केला.