लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पोलीस दलातील बदल्यांबाबतचा फोन टॅपिंगचा रिपोर्ट केंद्रीय गृहमंत्रालयाला सादर करण्यात आला आहे. त्यामुळे अनेकांचे बिंग फुटणार आहे, त्यामुळे काँग्रेससह तिन्ही पक्ष अस्वस्थ आहेत, असा दावा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलताना केला.
फोन टॅपिंग प्रकरणाचा अहवाल केंद्रीय गृहमंत्रालयाला सादर झाला आहे. त्यातून अनेकांचे बिंग फुटणार आहे. त्यामुळेच अनेक जण अस्वस्थ झाले आहेत, असे फडणवीस म्हणाले. महाराष्ट्र पोलीस दलाची बदनामी करण्याचे काम कुणी केले? वाझेसारख्या निलंबित अधिकाऱ्याला सेवेत घेऊन त्याच्याकडे महत्त्वाच्या केसेस देण्यात आल्या. वाझेसारख्यांना सेवेत घेऊन सिंडिकेट राज चालवण्यात आले. त्यामुळे पोलीस बदनाम झाले की पोलिसांच नाव झाले ते सांगा? असा सवाल त्यांनी केला.
एनआयएच्या चौकशीमुळे आघाडीतील लोक अस्वस्थ आहेत. नवाब मलिक आणि त्यांचे सहकारी घाबरले आहेत. वाझे काय बोलणार याची त्यांना भीती वाटत आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे वाझेंचे बोलविते धनी चिंतेत आहेत, असेही ते म्हणाले. मी केवळ फोन टॅपिंग प्रकरणाची दोन पाने दिली होती. मलिक यांनी अख्खा अहवाल देऊन अहवाल फोडला, असा दावाही त्यांनी केला.
काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केलेल्या आरोपांबाबत देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आले. त्यावर सावंतांना मी काय उत्तर द्यायचे, त्यांना काय समजते, रोज ते काहीही बोलतात, आमचे राम कदम आहेत ते त्यांना उत्तर देतील, मला उत्तर द्यायची गरज नाही. पोलिसांच्या सीसीटीव्हीचा डीव्हीआर कुणीही गायब केला तरी त्याचा बॅकअप मेन सर्व्हरला आहे. प्रायव्हेट डीव्हीआर नष्ट करणे सोपे आहे. पण पोलिसांचा डीव्हीआर गायब करणे सोपे नाही. त्यामुळे त्याचे पुरावे मिटणार नाहीत. तशी व्यवस्थाच करून ठेवली आहे, असेही ते म्हणाले.
देशातील कोरोनाची स्थिती आणि महाराष्ट्राची स्थिती यातील अंतर इतके का आहे, याचा विचार महाराष्ट्र सरकारला करावा लागेल. जितक्या लस केंद्राने दिल्या, त्या अजूनही वापरलेल्या नाहीत. त्यामुळे उगाच केंद्रावर टीका करण्याऐवजी प्रत्यक्ष कोरोना नियंत्रणाचे उपाय राबविले पाहिजे. नागपुरातील स्थिती दिवसागणिक भयावह होत आहे. ४,५०० केसेस दररोज आढळत आहेत. स्थिती गंभीर आहे. प्रशासनाने पूर्णपणे अॅक्टिव्ह मोडमध्ये जाऊन लोकांना दिलासा द्यावा आणि प्रत्यक्ष मदतही करावी, असे ते म्हणाले.