नागपूर : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमचा हस्तक सलीम कुत्ता याच्यावरून राजकारण परत एकदा तापले आहे. मंत्री गिरीश महाजन यांचे सलीम कुत्तासोबत संबंध असून एका लग्नातील त्यांचे फोटोदेखील माझ्याकडे असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे सदस्य एकनाथ खडसे यांनी विधानपरिषदेत केले. यावरून सभागृहात चांगलाच गोंधळ झाला. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे सर्व आरोप फेटाळले असून या प्रकरणातील चौकशी समितीने महाजन यांना क्लिनचीट दिली होती, अशी माहिती सभागृहासमोर मांडली.
नाशिकमधील एका लग्नात गिरीश महाजन हे देखील सलीम कुत्ता याच्यासोबत उभे होते. त्यांचे त्याच्याशी संबंध आहेत, असा आरोप करून खडसे यांनी सभागृहात फोटो दाखवला. सत्ताधारी बडगुजर यांच्यावर आरोप करतात तेव्हा लगेच एसआयटीची गोष्ट होते. मात्र आम्ही आरोप करतो तेव्हा सत्ताधारी चिडतात. महाजन यांचीदेखील एसआयटीच्या माध्यमातून चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी खडसे यांनी केली. पॉईंट ऑफ प्रोसिजरचा मुद्दा उपस्थित करत प्रवीण दरेकर व शंभुराज देसाई यांनी या आरोपांवर आक्षेप घेतला.
कुठलीही नोटीस न पाठवता मंत्र्यांचे नाव घेत आरोप कसे झाले असा प्रश्न उपस्थित केला. यावर अनिल परब, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीदेखील आक्रमक भूमिका घेतली. यासंदर्भात खडसे यांनी मांडलेला स्थगन प्रस्ताव उपसभापतींनी नाकारला. मात्र विरोधकांकडून उपसभापतींसमोरील मोकळ्या जागेत येऊन गोंधळ करण्यात आला. अखेर कामकात १० मिनिटांसाठी तहकूब करावे लागले.
उद्धव ठाकरेंसमोर ‘इम्प्रेशन’ पाडताहा गोंधळ सुरू असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सभागृहात उपस्थित होते. उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनीदेखील मंत्र्यांचे नाव न घेता बोलण्यास सांगितले. मात्र विरोधकांकडून महाजन यांचे नाव घेण्यात येत होते. स्थगन नाकारण्यात येत असल्याचे म्हटल्यावरदेखील विरोधक चर्चेची मागणी करत होते. तु्म्ही उद्धव ठाकरेंसमोर इम्प्रेशन पाडता अशी टिप्पणी उपसभापतींनी दानवे यांना उद्देशून केली.
विरोधकांनी तत्काळ माफी मागावी : फडणवीसया मुद्द्यावर फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यांची भूमिका मांडली. त्या लग्नात गिरीश महाजन गेले होते ते नाशिकच्या मोठ्या धर्मगुरूंच्या कुुटंबातील लग्न होते. त्यांचे दाऊदशी कुठलेही संबंध नाहीत.ज्यांच्याशी लग्न झाले त्यांच्यादेखील दाऊदशी कुठलाही संबंध नाही. त्यावेळी सब आरोप माध्यमांमध्ये झाल्यावर मी गृहमंत्री म्हणून चौकशी समिती नेमली होती. त्याच्या अहवालात आयोजकांचा दाऊदशी कुठलाही संबंध नाही, असे अहवालात स्पष्ट होते. उद्धव ठाकरे आले म्हणून अशा प्रकारेच विषय आले असतील. एका मंत्र्यावर अशा प्रकारचे आरोप करताना त्याची खातरजमा करायला हवी. अशा प्रकारची तडफड बडगुजर सलीम कुत्तासोबत नाचतात तेव्हा का दाखवली नाही. विरोधकांनी या प्रकाराबाबत माफी मागितली पाहिजे, असे फडणवीस म्हणाले.