बिल देण्यास नकार : ऑडिओ क्लिप व्हायरल
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपचाराच्या नावाखाली कोविड हॉस्पिटल प्रशासनाने साडेचार लाख रुपये उकळल्यानंतर त्याचे बिल देण्यास नकार दिला. एवढेच नव्हे, तर असंबध्द माहिती देऊन रुग्णाच्या नातेवाईकांची बोळवण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे एका रुग्णाच्या मुलाने विम्स हॉस्पिटलच्या डॉक्टरविरुद्ध पोलीस तसेच जिल्हा प्रशासनाकडे तक्रार नोंदविली. डॉक्टरसोबत झालेल्या चर्चेची ऑडिओ क्लिपही व्हायरल केली. त्यामुळे सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली आहे.
जयेश किशोर साखरकर (वय २५) असे तक्रार नोंदविणाऱ्या तरुणाचे नाव असून, ज्यांच्याविरुद्ध तक्रार करण्यात आली, त्या डॉक्टरांचे नाव राजेश सिंघानिया आहे. ते विम्स हॉस्पिटलचे संचालक असल्याचे सांगितले जाते.
जयेशचे वडील किशोर साखरकर यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे २६ एप्रिलला विम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. यावेळी रुग्णालय प्रशासनाने त्यांच्याकडून साडेचार लाख रुपये ॲडव्हान्स घेतला. नंतर औषधाचे एक लाख २० हजार रुपये वेगळे घेतले. २ मे रोजी किशोर साखरकर यांना सुटी दिली. त्यावेळी जयेशने बिलाबाबत विचारणा केली असता, रुग्णालय प्रशासनाने पुन्हा पन्नास हजार रुपयांची मागणी केली. बिल देण्यास मात्र नकार दिला. एवढेच नव्हे, तर नर्सला पाचऐवजी पंचवीस हजार रुपये द्यावे लागतात, जास्तीचे पैसे देऊन सिलिंडर घ्यावी लागतात, इतर रुग्णालयात जास्त पैसे द्यावे लागले असते, असे सांगून जयेशची बोळवण करण्याचा प्रयत्न केला. डॉक्टरसोबत झालेली चर्चा जयेशने रेकॉर्ड करून, आज पोलीस तसेच जिल्हा प्रशासनाकडे त्याची तक्रार केली. सिंघानिया यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप लावून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली. पुरावा म्हणून त्याने संभाषणाची ऑडिओ क्लिपही संलग्न केली. ही ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
----
चौकशी सुरू आहे...
यासंबंधाने सदरचे पोलीस निरीक्षक पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी हे प्रकरण चौकशीसाठी महापालिका प्रशासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले.
---
सरकारी यंत्रणा आणि प्रशासनाकडून वारंवार खासगी रुग्णालयात कोरोना उपचार करणाऱ्या रुग्णालयांना दर ठरवून दिले आहेत. मात्र त्याचे पालन न करता रुग्णांच्या नातेवाईकांची खासगी रुग्णालयांच्या संचालकांनी आर्थिक पिळवणूक चालवली आहे. त्यासंबंधीची रोज ओरड होत आहे. मात्र ठोस कारवाई होत नसल्याने खासगी रुग्णालयांचा हा गोरखधंदा जोरात सुरू आहे.
--