हिंगणा : भाजप आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामाचे प्रस्ताव रोखून ठेवण्याचे धोरण महाविकास आघाडी सरकारने अंगिकारले आहे. युती सरकारच्या काळात हिंगणा तालुक्यात ३०० कोटींच्या विकास कामांना मंजुरी मिळाली होती. महाविकास आघाडी सरकारने निधी रोखून ठेवल्याने ही कामे बंद झाल्याचा आरोप आ. समीर मेघे यांनी गुरुवारी मोहगाव येथे एका पत्रपरिषदेत केला.
हिंगणा मतदारसंघात एमआयडीसी, राष्ट्रीय महामार्ग, २५ जिल्हा मार्ग व १८३ गावांना जोडणारे रस्ते आहेत. २०१४-१९ या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारातून १५९० कोटींची विकास कामे झाली. तुरागोंदी व लखमापूर सिंचन प्रकल्पकरिता अनुक्रमे ४० व ५० कोटीचा निधी दिल्याने ६४० हेक्टर जमीन सिंचनाखाली आली. वीज वितरणाचे ८ नवीन सबस्टेशन झाले. १६ गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून २०० कोटींच्या प्रस्तावांना मान्यता मिळाली. मात्र महाविकास आघाडी सरकार चांगले काम करणाऱ्या भाजप आमदारांच्या मतदार संघात निधीची अडवणूक करीत खोडा टाकण्याचे काम करीत असल्याचा आरोप मेघे यांनी केला. यासोबतच भाजपचे वर्चस्व असलेल्या नगर परिषदांना विकास निधी देण्यात या सरकारकडून सापत्न वागणूक दिली जात आहे. हिंगणा मतदार संघातील बुटीबोरी व वानाडोंगरी न.प. हे याचे ज्वलंत उदाहरण असल्याचे मेघे म्हणाले. पत्रपरिषदेला भाजप अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष अंबादास उके, जि.प. सदस्य आतिष उमरे, सुरेश काळबांडे, विनोद ठाकरे आदी उपस्थित होते.