नागपूर : वंचित बहुजन आघाडी व एमआयएमची युती खा. असदुद्दीन ओवेसी यांच्यासोबत झाली आहे. त्यांच्याकडून जोपर्यंत स्पष्टीकरण येत नाही, तोपर्यंत आमची युती कायम आहे, असे सांगत वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी खा. इम्तियाज जलील यांच्याकडे दुर्लक्ष करण्याची भूमिका घेतली.
वंचित बहुजन आघाडीशी असलेली एमआयएमची युती तुटल्याची घोषणा खा. इम्तियाज जलील यांनी शुक्रवारी औरंगाबाद येथे केली. तसे पत्रकही त्यांनी काढले. यावर अॅड. आंबेडकर म्हणाले, आमची युती एमआयएमचे प्रमुख खा. असदुद्दीन ओवेसी यांच्यासोबत झाली आहे. जागा वाटपाबाबत पुण्यात एक बैठकही झाली. अजून चर्चा सुरू आहे. त्यामुळे जोपर्यंत ओवेसी यांच्याकडून काही स्पष्टीकरण येत नाही, तोपर्यंत आमची युती कायम आहे. कोणी, काय पत्रक काढले याच्याशी काही संबंध नाही. अॅड. आंबेडकर यांनी यावेळी फडणवीस सरकारवरही टीका केली. एखादी दारुडा व्यक्ती जशी घरातील एकेक साहित्य विकते, हे सरकारही त्या दारुड्या व्यक्तीप्रमाणे आहे. तिजोरीत पैसे नाही. विकायलाही आता काही शिल्लक नाही. त्यामुळे आता शिवाजी महाराजांचे ऐतिहासिक किल्ले विकायला निघाले, असा आरोप त्यांनी केला.