प्रधानमंत्री आवास योजनेत प्रशासनाचीच आडकाठी : आजवर फक्त पाच हजार पट्टे वाटप
गणेश हूड
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहरात झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे वाटप रखडले आहे. यामुळे दुर्बल घटकातील हजारो लोकांचे प्रधानमंत्री आवास योजनेचे स्वप्न भंगले आहे.
शहरात स्लम भागात १ लाख ७१ हजार ६४५ घरे आहेत. यात जवळपास ८ लाख ५८ हजार ९८३ नागरिकांचे वास्तव्य आहे. यातील तीन लाखाहून अधिक लोकांनी घरे पक्की बांधलेली नाहीत. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पक्के घर बांधावयाचे झाल्यास मालकी पट्टा असणे आवश्यक आहे. परंतु १५ ऑगस्ट २०२१ पर्यंत फक्त ५ हजार मालकी पट्टे वाटप करण्यात आले. १४ हजाराहून अधिक झोपडपट्टीवासीयांचे अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयातील नझूल तहसीलमध्ये दोन वर्षांपासून प्रलंबित आहेत.
दिलासादायक म्हणजे, नागपूर सुधार प्रन्यासने सर्वाधिक ३ हजार ३१९ रहिवाशांना मालकी पट्टे वाटप केले आहे. महापालिका कार्यक्षेत्रातील १६ झोपडपट्ट्यांमधील १ हजार ५५० लोकांचे पट्टे पंजीबद्ध झाले आहेत. शहरातील सर्वाधिक झोपडपट्ट्या सरकारी नझूलच्या जमिनीवर वसलेल्या असूनही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील पट्टे वाटप कोरोना काळापासून जवळपास ठप्प आहे. नझूलच्या पट्ट्यांची संख्या चार वर्षांत ४०० पर्यंतही पोहोचलेली नाही.
नासुप्रच्या जमिनीवर ६७ झोपडपट्ट्या आहेत. त्यातील दक्षिण विभागात सर्वाधिक २ हजार ३८२ झोपडपट्टीवासीयांचे पट्टे पंजीबद्ध झाले आहेत. त्यात एकट्या स्वातंत्र्यनगर-नंदनवन येथील १ हजार १३७ पट्टे असून, त्याखालोखाल पूर्व विभागात ७६६ पट्टे पंजीबद्ध झाले आहेत. पश्चिम विभागात प्रन्यासच्या कार्यक्षेत्रातील सहापैकी पाच वस्त्यांचे पट्टे वाटप झुडपी जंगलामुळे अडले आहे. तर उर्वरित लक्ष्मीनगर झोपडपट्टीतील ११० पैकी ७७ रहिवाशांचे पट्टे पंजीबद्ध झालेले आहेत.
...