‘जयपूर फूट’ वाटप शिबिर : राज्यभरातील दिव्यांगांची गर्दी नागपूर : मागील १४ आॅक्टोबरपासून धंतोली येथील यशवंत स्टेडियम येथे सुरू असलेल्या जयपूर फूट, साहित्य व साधने वाटप शिबिरात आतापर्यंत तब्बल ४८९ दिव्यांगांना साहित्य वाटप करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, भगवान महावीर विकलांग सहायता समिती, जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र, जिल्हा परिषद आणि नागपूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिराचे १४ आॅक्टोबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते. पुढील २५ आॅक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या शिबिरात दोन हजारांपेक्षा अधिक दिव्यांगांना साहित्य वाटप केले जाणार आहे. त्यातच आतापर्यंत मागील चार दिवसांत ६९७ लोकांनी नोंदणी केली असून, त्यापैकी ४८९ लाभार्थीना साहित्य वाटप करण्यात आले आहे. यात ४०२ लाभार्थींना जयपूर फूट व कॅलिपर आणि ८७ लाभार्थींना श्रवणयंत्र देण्यात आले आहे. या शिबिरात रोज राज्यभरातील लोक येत आहेत. बाहेरून येणाऱ्या या सर्व लोकांसाठी येथे नि:शुल्क नाश्ता, चहा आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. या सोयी-सुविधेचा येथे रोज शेकडो दिव्यांग आणि त्यांचे नातेवाईक लाभ घेत आहेत. विशेष म्हणजे, येथे येणाऱ्या दिव्यांगांमध्ये ७० वर्षांच्या वृद्धापासून तर अगदी दोन-तीन वर्षांच्या चिमुकल्यांचा सुद्धा समावेश आहे. (प्रतिनिधी)येथेच थाटले वर्कशॉप भगवान महावीर विकलांग सहायता समितीने शिबिरात येणाऱ्या दिव्यांगांना तात्काळ जयपूर फूट व कॅलिपर मिळावे यासाठी यशवंत स्टेडियममध्येच वर्कशॉप थाटले आहे. या वर्कशॉपमध्ये जयपूरवरून आलेले सुमारे ३० कारागीर रात्रंदिवस काम करून रोज ६० ते ७० जयपूर फूट आणि कॅलिपर तयार करीत आहे. विशेष म्हणजे, या ३० कारागिरांपैकी सुमारे ५ ते ६ कारागीर स्वत: अपंग असून ते जयपूर फूटवर चालत आहे. याशिवाय येथे मनपा कर्मचाऱ्यांची चमू सुद्धा रात्रंदिवस राबत आहे. शिबिरात प्रत्येक दिवशी अपेक्षित संख्येपेक्षा कितीतरी अधिक दिव्यांग येत असून, त्या प्रत्येकाला साहित्य वाटप केले जात आहे. जयपूर फूटने स्वावलंबी बनविलेनागपूर : वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी मागील १९८६ मध्ये एका रेल्वे अपघातात दोन्ही पाय गेले. त्यावेळी आपण कायमचे अपंग झालो, असा विचार करून खचलो होतो. परंतु काहीच दिवसांत भगवान महावीर विकलांग सहायता समितीद्वारे जयपूर फूटची माहिती मिळाली, आणि जगण्याची हिंमत आली. त्यानंतर जयपूर फूटच्या मदतीने मी पुन्हा दोन्ही पायावर उभा झालो. चालू लागलो. अगरबत्तीचा व्यवसाय करून स्वत:चे पोट भरू लागलो. त्यामुळे आज मी स्ववलंबी जीवन जगत आहे. निराधार म्हणून शासनाकडून महिन्याला ६०० रुपयांचा पगार मिळतो, परंतु तो मी वृद्घ आईला देतो. या शिबिरात आता नवीन दोन्ही जयपूर फूट मिळाले आहे. त्यामुळे भविष्याची चिंता मिटली आहे. हरी दौलत गोळे, मुरलीधर कॉम्प्लेक्स, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपूर.
४ दिवसांत ४८९ दिव्यांगांना साहित्य वाटप
By admin | Published: October 19, 2016 3:22 AM