सुमेध वाघमारे नागपूर‘एचआयव्ही’सह जगणाऱ्या रु ग्णांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या ‘एआरटी’ (अँटी रिट्रोव्हायरल थेरपी) औषधांचा तुटवडा नेहमीच पडतो. अशावेळी रुग्णांना महिन्याऐवजी दर आठवड्याला रुग्णालयांकडे चकरा माराव्या लागतात. परिणामी औषधे घेण्याचे अनेकांचे वेळापत्रक बिघडते, जीवघेणी परिस्थिती निर्माण होते. यावर उपाय म्हणून ‘नॅको’ (‘नॅशनल एड्स कंट्रोल सेंटर) प्रत्येक एआरटी सेंटरवर औषध वितरण प्रणालीवर नियंत्रण आणण्यासाठी ‘इन्वेंट्री मॅनेजमेन्ट सिस्टिम’ (आयएमएस) लावणार आहे. याला बायोमेट्रिक जोडले जाणार असून कोण, किती औषधे घेऊन गेले व उपलब्ध साठ्याची माहिती मिळू शकेल, त्यानुसार नॅको औषधे उपलब्ध करून देणार आहे. एचआयव्ही पूर्ण बरे करता येत नाहीत म्हणून प्रतिबंध अत्यंत महत्त्वाचा आहे. यासाठी सरकारने एचआयव्हीबाधितांना मोफत उपचार, मार्गदर्शन व औषधे वितरणासाठी राज्यभरात मेडिकल रुग्णालयांसह, जिल्हा व उपजिल्हा रुग्णालयात एआरटी केंद्र सुरू केले. या केंद्रातून मिळणाऱ्या औषधोपचारांमुळे आरोग्यपूर्ण आयुष्य जगता येते. आयुष्यमान आणि जीवनाची गुणवत्ता वाढते, प्रतिकारशक्ती वाढते, आजाराची वाढ खुंटते आणि संसर्ग होण्याची शक्यताही कमी होते. या आजारात औषधांचा सातत्यपूर्ण मारा शरीराला शक्ती प्रदान करतो, परंतु योग्य वेळी औषध न घेतल्यास, औषधाचा खंड पडल्यास व्हायरलची वाढ होण्याची प्रक्रि या सुरू होते. म्हणूनच एआरटी केंद्रांवर किमान तीन महिने पुरेल एवढा औषधांचा साठा ठेवण्याचा नियम आहे. यासाठी दर आठवड्याला औषधांच्या साठ्यांचा तपशील ‘एमसॅक’ला (महाराष्ट्र एड्स कंट्रोल सेंटर) पाठविणे आवश्यक असायचे. मात्र तरीही अनेक सेंटरला औषध तुटवड्याला सामोरे जावे लागत असे. गेल्या वर्षी तब्बल दोन-तीन महिने औषधांचा तुटवडा पडला होता. याची गंभीर दखल ‘नॅको’ने घेऊन ‘इन्व्हेंट्री मॅनेजमेन्ट सिस्टिम’ प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला. याची सुरुवात कर्नाटकमधून झाली असली तरी ८ मेपासून राज्यात लागू करण्यात आली आहे. यासाठी प्रत्येक एआरटी केंद्रातील डाटा मॅनेजर व फार्मासिस्ट यांना नुकतेच एक दिवसाचे प्रशिक्षण देण्यात आले. लवकरच संगणक आणि बायोमेट्रिक प्रणाली उपलब्ध करून दिले जाणार आहे.
एचआयव्हीबाधितांना औषधांचे वाटप ‘आयएमएस’ प्रणालीद्वारे
By admin | Published: May 13, 2015 2:46 AM