बलात्कारामुळे धारण गर्भ पाडण्याची परवानगी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 09:18 PM2018-09-06T21:18:39+5:302018-09-06T21:19:57+5:30
बलात्कारामुळे धारण झालेला गर्भ पाडण्यासाठी पीडित अल्पवयीन मुलीने तिच्या आईमार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने मुलीच्या आवश्यक तपासण्या करण्यासाठी तज्ज्ञांचे वैद्यकीय मंडळ स्थापन करण्याचा आदेश गुरुवारी राज्य सरकारला दिला. तसेच, येत्या शनिवारी मुलीची तपासणी करून सोमवारी अहवाल सादर करण्यास सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बलात्कारामुळे धारण झालेला गर्भ पाडण्यासाठी पीडित अल्पवयीन मुलीने तिच्या आईमार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने मुलीच्या आवश्यक तपासण्या करण्यासाठी तज्ज्ञांचे वैद्यकीय मंडळ स्थापन करण्याचा आदेश गुरुवारी राज्य सरकारला दिला. तसेच, येत्या शनिवारी मुलीची तपासणी करून सोमवारी अहवाल सादर करण्यास सांगितले.
प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व मुरलीधर गिरटकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. संबंधित मुलगी १६ वर्षे १० महिने वयाची असून, तिच्या पोटात २० आठवडे पूर्ण झालेला गर्भ आहे. ती बोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते. आरोपी आकाश दातारकरने १८ आॅगस्ट २०१८ रोजी मुलीचे अपहरण करून तिला ठाणे व नाशिक येथे नेले. त्याची १९ आॅगस्ट रोजी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. पोलिसांनी मुलीला शोधून काढल्यानंतर तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यात ती गर्भवती असल्याचे आढळून आले. त्यानंतर अधिक चौकशी केली असता आरोपी हा मुलीवर फेब्रुवारी-२०१८ पासून अत्याचार करीत होता, हे प्रकाशात आले.
मेडिकलमधील डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, मुलगी गर्भधारणेसाठी शारीरिकदृष्ट्या सक्षम नाही. त्यामुळे गर्भधारणा तिच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी धोकादायक आहे. तसेच, गर्भधारणा मनाविरुद्ध झाली असल्यामुळे मुलीलाही त्यातून सुटका हवी आहे. परिणामी, तिने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मुलीतर्फे अॅड. चिन्मय धर्माधिकारी यांनी बाजू मांडली.