लाेकमत न्यूज नेटवर्क
कुही : लाभार्थ्यांना शिधापत्रिकांवर धान्याचे वाटप करीत असताना पाॅस मशीनवर त्यांच्या अंगठ्याचे निशान घ्यावे लागते. कुही तालुक्यात काेराेना संक्रमण झपाट्याने वाढत असून, या प्रकारामुळे संक्रमण आणखी वाढण्यास मदत हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ‘डिलर नाॅमिनी’द्वारे धान्य वाटपास परवानगी द्यावी, अशी मागणी शासकीय स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार रमेश पागाेटे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
कुही तालुक्यातील काही गावे हाॅटस्पाॅट बनली असून, काही गावांची हाॅटस्पाॅटकडे वाटचाल सुरू झाले आहे. तालुक्यात राेज ९ ते १०० रुग्णांची भर पडत आहे. शिवाय, रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याच काळात शिधापत्रिकाधारकांना त्यांच्या वाट्याच्या धान्याचेही वाटप करावे लागत आहे. धान्य वितरण करताना पाॅस मशीनवर लाभार्थ्यासाेबतच दुकानदारांचा अंगठा नाेंदविणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया करताना लाभार्थ्यांसह दुकानदारांना काेराेना लागण हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही.
याच प्रकारामुळे पहिल्या टप्प्यात नागरिकांसाेबतच स्वस्त धान्य दुकानदारांना काेराेनाची लागण झाली हाेती. यात काही दुकानदारांचा काेराेनाने बळीदेखील घेतला. हाच प्रकार पुन्हा घडू नये तसेच लाभार्थ्यांसह दुकानदार सुरक्षित राहण्यासाठी ‘डिलर नाॅमिनी’द्वारे धान्य वाटपास परवानगी द्यावी, अशी मागणीही या निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनाची एक प्रत जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनाही पाठविण्यात आली आहे. शिष्टमंडळात संघटनेचे सचिव प्रदीप घुमडवार, फुलचंद कढव, राजू शेंडे, देवानंद उके, अशोक चांदपूरकर यांच्यासह दुकानदारांचा समावेश हाेता.