लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : टाळेबंदीमुळे शहरातील १० हजार सलून कारागीर बेरोजगार झाले आहेत. आता महाराष्ट्रात ‘मिशन बिगिन अगेन’अंतर्गत अनेक व्यवसायांना मुभा मिळाली आहे तर केश कर्तनालयांनादेखील व्यवसाय सुरू करण्याची मुभा मिळणे गरजेचे असल्याची भावना शहरातील प्रसिद्ध सलून व्यावसायिक तसेच ब्वायजोन व रिपोसोचे संचालक सतीश मानकर यांनी व्यक्त केली. लोकांच्या शारीरिक स्वच्छतेकरिता कर्तनालये उघडणे गरजेचे आहे. वाटल्यास कठोर निर्बंध लावा. आम्हाला हे निर्बंध मंजूर असतील असेही मानकर म्हणाले.शहरात किती सलून व्यावसायिक आहेत?दहा हजाराहून अधिक कारागीर या व्यवसायाशी जुळले आहेत. ते सगळे संकटात सापडले आहेत. गेल्या दोन महिन्यापासून कोणतेही काम नसतानाही सलून संचालकांनी स्वत:कडून पगार दिला. मात्र, आता संचालकांचीही आर्थिक स्थिती ढासळत आहे. अशास्थितीत हजारो कारागिरांच्या रोजगारास सुरुवात करणे अत्यंत गरजेचे झाले आहे.व्यवसायाला परवानगी मिळाली तरी डिस्टन्सिंग कसे पाळाल?व्यवसायाला परवानगी मिळाली तर सर्वप्रथम अपॉईंटमेंटची सिस्टीम सुरू करू आणि वेटिंग सिस्टीम बाद करून टाकू. यामुळे अनावश्यक गर्दी वाढणार नाही. सलूनमध्ये जेवढ्या खुर्च्या असतील त्याच्या अर्ध्यापेक्षा कमी ग्राहकांना प्रवेश देऊन सेवा दिली जाईल. कारागिरांनाही आॅड-इव्हन फॉर्म्युल्याने बोलावले जाईल.सलून उघडण्यासाठी नागरिकांचा आग्रह होत आहे का?हो. गेल्या दोन महिन्यापासून अनेक ग्राहकांनी प्रामाणिकपणे टाळेबंदीच्या नियमांचे पालन केले. त्यामुळे अनेकांनी कटिंग किंवा दाढीही केलेली नाही. त्यामुळे आता त्यांचे फोन येत आहेत. परंतु, निर्बंध असल्याने नियम तोडणे योग्य नाही. मात्र, आता हा व्यवसाय सुरू करण्याची गरज आहे. प्रत्यक्ष आणि अपरोक्ष स्वरूपात या व्यवसायाशी लाखो लोक जोडले गेले आहेत. त्यांच्याही रोजगारावर संकट आले आहे.दुसऱ्या राज्यांमध्ये सलून सुरू झाले का?गुजरातमध्ये २० दिवसापूर्वी सलून उघडण्यात आले आहेत. दिल्लीमध्येही सलून उघडण्याचा निर्णय झाला आहे.तामिळनाडूमध्येही हा व्यवसाय सुरू होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही निर्बंध उठवणे योग्य ठरेल. खरे सांगायचे तर निर्बंध असतानाही लपूनछपून दाढी, कटिंग केल्या जात आहे. यामुळे संसर्ग पसरण्याचा धोका अधिक आहे. मात्र, परवानगी मिळाल्यास नियमांचे प्राधान्याने पालन करण्यास बाध्य केले जाऊ शकते.
नागपुरात कडक निर्बंधासह केश कर्तनालयांना परवानगी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2020 12:21 AM