नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील बलात्कारपीडित अल्पवयीन मुलीचा गर्भपात करण्याची परवानगी मिळविण्यासाठी आईने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने मुलीच्या आवश्यक वैद्यकीय तपासण्या करण्यासाठी चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील तज्ज्ञांचे मंडळ स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच मंडळाकडे २८ मेपर्यंत अहवाल मागितला आहे.
या प्रकरणावर न्यायमूर्ती पुष्पा गणेडीवाला यांच्या समक्ष सुनावणी झाली. पीडित मुलगी १५ वर्षे वयाची असून, तिच्या गर्भात २१ आठवड्यांचे बाळ आहे. तिच्यावर बांधकाम मजूर सहीराम संजय गायकवाडने बलात्कार केल्याचा आरोप आहे. गायकवाडविरुद्ध जीवती पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी आरोपीला कामावर ठेवले होते. दरम्यान, त्याने ६ मार्च २०२० रोजी मुलीचे अपहरण करून तिला कोल्हापूर जिल्ह्यातील गावात नेले. तेथे मुलीवर वारंवार बलात्कार केला. मुलीला ८ मे २०२१ रोजी आरोपीच्या ताब्यातून सोडविण्यात आले, तेव्हा ती गर्भवती असल्याचे आढळून आले. मानसिक व आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे कुटुंबीयांनी तिचा गर्भपात करण्याचा निर्णय घेतला आहे. याचिकाकर्तीतर्फे अॅड. स्विटी भाटिया यांनी कामकाज पाहिले.