नागपूर : विदर्भातील सर्वच जिल्हे चांगलेच तापायला लागले आहेत. उष्णतामान ३८ अंशापर्यंत पोहचले असताना हवामान विभागाने विदर्भात उष्पतेची लाट येण्याची शक्यता वर्तविली आहे. सोबतच या आठवडाअखेर विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये पाऊस आणि विजेचा अंदाजही व्यक्त केला आहे.
विदर्भातील अकोला, नागपूर, चंद्रपूर हे जिल्हे चांगलेच तापायला लागले आहेत. उन्हाळ्याच्या प्रारंभीच असलेली ही स्थिती लक्षात घेऊन यावर्षी विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. यंदा सरासरीपेक्षा तापमान जास्त राहणार असल्याची शक्यता नागपूर हवामान केंद्राने वर्तविली आहे.
विदर्भासोबतच मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच उष्णता जाणवण्यास सुरुवात झाली आहे. महिन्याच्या पहिल्याच आठवडाअखेर सरासरी तापमान ३६ ते ३८ अंश सेल्सिअसच्या जवळपास पोहचले आहे. त्यामुळे यंदा मार्च ते मे या काळात दिवसा आणि रात्रीही उष्णता वाढणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
यंदाच्या उन्हाळ्यात वातावरणात मोठ्या प्रमाणावर शुष्कता राहणार असून, विदर्भात तापमान ४५ अंश सेल्सिअसच्याही वर राहील, असा इशारा देण्यात आला आहे. मार्चनंतरच्या काळात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला असून, विदर्भात सरासरीपेक्षा ४ ते ५ अंश सेल्सिअस जास्त तापमान राहणार आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात चांगलेच तापमान राहील, असे चित्र दिसत आहे.
...
आठवडाअखेर पावसाचा इशारा
विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये या आठवडाअखेर काही ठिकाणी तुरळक पाऊस आणि विजेचा इशारा नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे. सोमवारी दुपारी जारी केलेल्या अंदाजामध्ये १०, ११ आणि १२ मार्च या काळात विदर्भात सर्वच जिल्ह्यात पाऊस पडणार, असा अंदाज आहे. आधीचे दोन दिवस तुरळक आणि १२ तारखेला विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी चांगला पाऊस येऊ शकतो. नंतरच्या काळात वातावरण बदलल्यावर उकाडा चांगलाच वाढू शकतो, असा अंदाज आहे.
...