नागपूर : बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयात इंडियन सफारीसाठी येणाऱ्या पर्यटकांना आता एन्क्लोजरमध्ये ‘ली’ आणि ‘राजकुमार’ या दोघांना एकत्र पाहता येणार आहे. या दोघांमधील जवळीक वाढविण्यासाठी केलेल्या अनेक प्रयत्नांना यश आल्यानंतर प्रकल्प व्यवस्थापनाने बुधवारी त्यांना प्रथमच एकत्र खुल्या एन्कोलजरमध्ये सोडले आहे.
हे दोन्ही वाघ एकत्र राहून सुसंगतपणे वागू शकतात, याची खात्री पटल्यावरच गोरेवाडा प्रकल्पाने हे पाऊल उचलले. एकमेकांशी परिचित नसलेल्या या दोन्ही वाघांना आठ महिन्यांपूर्वी गोरेवाडातील टायगर सफारीमध्ये आणण्यात आले असले तरी त्यांना आजवर एकत्र सोडलेले नव्हते. काही दिवस ली तर नंतर काही दिवस राजकुमार यांना एन्लोजरमध्ये मोको सोडले जात होते. या दोघांचे वर्तन एकमेकांच्या अनुरूप होण्यासाठी मागील सुमारे ७ ते ८ महिने प्रयोग सुरू होते. त्यांच्या वर्तनात अपेक्षित अनुरूपता दिसल्याने आता हा निर्णय घेण्यात आला आहे.
येथे येणाऱ्या पर्यटकांना यापुढे सफारी दरम्यान हे दोन्ही वाघ एकाच वेळी पाहता येणार आहे. या दोघांना एकत्र आणण्यासाठी वन्यजीव संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे उपसंचालक डॉ. व्ही. एम. धूत आणि महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूरचे डॉ. मनोज पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले. डॉ. मयूर पावशे, डॉ. सुजीत कोलगंथ आणि डॉ. ए. एस. शालिनी आणि डॉ. सय्यद बिलाल यांच्या उपस्थितीत त्यांना एकत्र सोडण्यात आले. ही संपूर्ण प्रक्रिया महाराष्ट्र वन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक एन. वासुदेवन, मुख्य महाव्यवस्थापक संजीव गौड, महाव्यवस्थापक ऋषिकेश रंजन आणि वन्यजीव संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे डॉ. शिरीष उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाली.