नितीन गडकरी : डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांचा नागरी सत्कारलोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : प्रचंड विद्वत्तेसोबत कमालीची शालीनता व नम्रता असलेलं व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. चंद्रशेखर मेश्राम होय. अतिशय कठीण परिस्थितीतून त्यांनी आपले स्थान निर्माण केले असून, त्यांचा हा गौरव केवळ त्यांचा व्यक्तिगत नसून तो नागपूर-विदर्भ व आपल्या सर्वांचाच गौरव आहे, अशा शब्दात केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांचा गौरव केला. सुप्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांची जागतिक ट्रॉपिकल न्यूरोलॉजी या संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाली. या पदावर कुण्या भारतीय डॉक्टराची पहिल्यांदाच निवड झालेली आहे. त्यामुळे रविवारी डॉ. चंद्रशेखर मेश्राम नागरी सत्कार समितीच्या वतीने दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात नितीन गडकरी यांच्या हस्ते त्यांचा सपत्नीक नागरी सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी गडकरी बोलत होते. याप्रसंगी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदाताई जिचकार, ज्येष्ठ समाजसेवी डॉ. विकास आमटे, प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, खा. डॉ. विकास महात्मे, आ. डॉ. मिलिंद माने, आ. प्रा. जोगेंद्र कवाडे, आ. सुनील केदार, नम्रता मेश्राम, माजी आमदार रमेश बंग, एस.क्यू. जमा, जनमंचचे अध्यक्ष अॅड. अनिल किलोर, आयएमएच्या अध्यक्षा डॉ. वैशाली खंडाईत, नागरी सत्कार समितीचे अध्यक्ष चंद्रपाल चौकसे, सचिव डॉ. राजू खंडेलवाल आदी व्यासपीठावर होते. नितीन गडकरी म्हणाले, कुठलीही गुणवत्ता ही जात, पात, धर्म, पंथ पाहून ठरत नसते. ती व्यक्ती स्वत:च्या मेहनतीने प्राप्त करीत असते. डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी आज जे स्थान प्राप्त केले ते स्वत:च्या मेहनतीवर निर्माण केले आहे. आज शासकीय रुग्णालयांची स्थिती फार चांगली नाही. धर्मादाय संस्थांची मदत घेऊन ही परिस्थिती सुधारता येऊ शकते. त्यादृष्टीने आपण डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली. त्यांनी अहवाल सादर केला असून, त्यानुसार मुंबईत पोर्टच्या जागी पॅरामेडिकल सेवा सुरू करण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. डॉ. वेदप्रकाश मिश्रा म्हणाले डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांचा सत्कार म्हणजे कर्तव्य व समर्पणाचा सत्कार होय. अतुलनीय तर अनेक असतात, पण हा अनुकरणीय व्यक्तीचा सत्कार असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. डॉ. जब्बार पटेल म्हणाले, न्यूरोलॉजी हे क्षेत्रच मोठे क्लिष्ट आहे. अशा क्षेत्रात जगभरातील १२८ देशांच्या संघटनांची जबाबदारी हे मोठे आव्हान आहे. या माध्यमातून डॉ. मेश्राम यांना जगभरातील न्यूरोलॉजीचे प्रश्न हाताळता येतील. तसेच त्यांचा हा सत्कार दीक्षाभूमीवर व्हावा, यालासुद्धा एक मोठा वैचारिक वारसा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. डॉ. विकास महात्मे यांनी मानपत्राचे वाचन केले. संचालन रेणुका देशकर यांनी केले. राजू खंडेलवाल यांनी आभार मानले. लोकांचा खूप विश्वास, त्याला तडा जाऊ नयेआपल्या सत्काराला उत्तर देताना डॉ. चंद्रशेखर मेश्राम म्हणाले, जीवनात मी जे काही मिळविले आहे, त्यात माझा वाटा कमी आणि माझा परिवार, मित्रमंडळी, सहकारी, रुग्ण यांचाच वाटा अधिक आहे. माझ्यावर लोकांचा प्रचंड विश्वास आहे. या विश्वासाला कुठेही तडा जाऊ नये, याचाच प्रयत्न आपण करीत असतो. ज्यांच्या प्रेरणेने मी इथपर्यंत आलो त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाच्या सभागृहात माझा सत्कार होत आहे, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बाबा आमटे हे माझे प्रेरणास्रोत आहेत. सोसायटी हेल्दी राहावी यासाठी त्यांनी अनेक महत्त्वाच्या गोष्टीही यावेळी विशद केल्या. जीवनातील कुठल्याही घटनेला राजकारणी लोक हे अतिशय सकारात्मकपणे सामोरे जातात. राजकारण्यांमध्ये असलेले हे गुण इतर कुणामध्येही नाही. यापुढचे माझे संशोधन यावरच राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले. डॉ. मेश्राम हे आमच्या डीएनएमधील - विकास आमटे ज्येष्ठ समाजसेवी डॉ. विकास आमटे म्हणाले की, चंद्रशेखर मेश्राम हे आमच्या (आनंदवनच्या) डीएनएमधील आहेत. कुष्ठरोग्यांना त्यांचा मोठा आधार आहे. हा व्यक्ती म्हणजे नागपूरचा हिरा असून, अतिशय जपून ठेवण्याची आवश्यकता आहे. सध्या ते जगाच्या नकाशावर पोहोचले असून उद्या त्यांना चंद्रावरही जावे लागू शकते. कारण तिथे राहणाऱ्या व्यक्तींच्याही मेंदूची तपासणी आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
विद्वत्तेसोबतच शालीनतेचे धनी
By admin | Published: May 29, 2017 3:01 AM